‘स्वाईन फ्ल्यू’ या संसर्गजन्य आजारावर होमिओपॅथीमध्ये रामबाण तसेच स्वस्तात औषध उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन होमिओपॅथी इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशनने (हिम्पाम) केले आहे.
सध्या अॅलोपॅथीमध्ये स्वाईन फ्लूवर ‘टॅमी फ्लू’ हे औषध असले तरी त्याचा शंभर टक्के लाभ होतोच, असे नाही. याशिवाय त्याचे दुष्परिणामही होतात. तसेच प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. परंतु ती अत्यंत महागडी असल्याने ती सर्वसामान्य नागरिक खरेदी करू शकत नाही. त्यामानाने होमिओपॅथीमध्ये अत्यंत विश्वसनीय औषधे आहेत. ही औषधे ज्या राज्यात शासनातर्फे वाटप केली जाते, त्या राज्यात स्वाईन फ्लूचा दुष्परिणाम फार कमी दिसून येतो, अशी माहिती होमिओपॅथी तज्ज्ञ व होमिओपॅथी कौन्सिल ऑफ इंडियावर विदर्भातून निवडून गेलेले डॉ. डी.बी. चौधरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
यापूर्वी देशातील काही राज्यात ‘चिकन गुनिया’ आणि ‘डेंग्यू’ या आजाराची साथ येऊन गेली. या साथीमध्ये होमिओपॅथीची औषधे देण्यात आलेले रुग्ण लवकर बरे झाले, असा दावाही ‘हिम्पाम’तर्फे करण्यात येत आहे. विदर्भात स्वाईन फ्लूची साथ आली आहे. दररोज कुठे ना कुठे मृत्यू होत आहे. इतर आजाराच्या तुलनेत या आजाराने मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी त्याचा प्रचार मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शासकीय व खासगी रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने आवाहन केले तर ‘हिम्पाप’तर्फे आम्ही नागपूरकरांना अत्यंत कमी दरात ‘स्वाईन फ्लू’वरील होमिओपॅथीवरील औषध उपलब्ध करून देण्यास तयार आहोत. लोकांनी स्वाईन फ्लूची भीती न बाळगता खबरदारी बाळगावी. लोकांमध्ये होमिओपॅथीबद्दल काही गैरसमज आहे, ते आधी दूर करावयास पाहिजे. अनेक आजार दूर करणारे औषधे असताना होमिओपॅथीबद्दल महाराष्ट्र शासन उदासीन आहे. होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, अशी विनंतीही डॉ. चौधरी यांनी याप्रसंगी केली.
सध्या सुरू असलेल्या साथीमुळे नागरिक होमिओपॅथी औषधाच्या दुकानात जाऊन स्वत:च्या मनाने औषधे घेत आहे. अशी औषधे डॉक्टरांच्या सल्यानेच घ्यावे. तसेच होमिओपॅथीच्या डॉक्टरांनीसुद्धा होमिओपॅथीच्या मूळ सिद्धांतावरच औषधाची निवड करावी. स्वाईन फ्लूवर प्रतिबंधात्मक व लागण झाल्यानंतर आर्सेनिक अॅकोनाईट, ब्रायोनिया, बेलाडोना, काली-कार्ब, काबरे-वेज, एन्फ्ल्यूएंजियम, इपीकॅक व पायरोजिनम या औषधांचा वापर केला जाऊ शकतो. ही औषधे प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. परंतु रुग्णांच्या लक्षणानुसार ती देणे महत्त्वाचे ठरते. स्वाईन फ्लू बाधीत रुग्णाला अॅलोपॅथी औषधांसोबतच होमिओपॅथी औषधे दिले जाऊ शकतात.
सध्या स्वाईन फ्लूचा प्रसार आणि प्रचार होण्यास सहाय्यभूत ठरणारे वातावरण निर्माण झाले आहे. स्वाईन फ्लू आजाराची लक्षणे दिसताच ४८ तासाच्या आत रुग्णालयात जाऊन औषधोपचार सुरू केल्यास या आजाराची तीव्रता कमी होते. तसेच मृत्यूच्या तावडीतूनही बाहेर पडण्यास मदत होते. कमाल तापमान हे ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, तेव्हा हा आजार आपोआपच कमी होईल, असेही डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा