मुळा नदीला आलेल्या पूरात दोन जण अडकून पडले होते. अखेर अठरा तासानंतर आज सकाळी त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. तालुक्यातील मेचकरवाडी येथे ही घटना घडली.
मेचकरवाडी येथील मुळा नदीवर असणाऱ्या मेचकरवाडी ते पैठण दरम्यानच्या पूलाच्या खालील बाजूस काल दुपारी भाऊराव लाकडे हा मासे पकडण्यासाठी नदीवर गेला होता. नदीत जाळे फेकून मासे पकडण्याचे त्याचे काम सुरु होते. त्याचवेळेला बाळू भवारी हा ग्रामपंचायत कर्मचारी पाणी योजनेचा वीज पंप सुरु करण्यासाठी नदीवर आला, नंतर तोही भाऊराव याच्याकडे गेला. हरिश्चंद्रगड परिसरात काल दुपारनंतर तुफानी पर्जन्यवृष्टी झाली. दुपारी चारच्या सुमारास नदीला फारसे पाणी नव्हते मात्र अचानक पूराचा मोठा लोंढा आला. पाणीपातळी कधी वाढली हे दोघांना समजलेच नाही. पाणी वाढत चालल्यानंतर दोघांनी नदीपात्रात असणाऱ्या एका बेटावर आश्रय घेतला. पाण्याची पातळी हळुहळू वाढतच होती त्यामुळे परतीचे त्यांचे मार्ग बंद झाले.
परिसरात दोघे जण पूरात अडकले आहेत ही घटना समजताच पंचक्रोशीतील लोकांनी नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर गर्दी केली. संपूर्ण रात्र या दोघांनी बेटावरील बाभळीच्या झाडाखालीच जागून काढली. त्यांना साथ करण्यासाठी गावातील काही लोक किनाऱ्यावर थांबले होते. प्रशासनालाही ही घटना कळविण्यात आली. तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, राजूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एन. कासार यांनी रात्री उशिरा घटनास्थळाला भेट दिली. सकाळी आवश्यक त्या साधनसामग्रीनिशी ते पुन्हा मेचकरवाडीत दाखल झाले. गावातील काही पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने तसेच लाईफ जॅकेट, टय़ुब, दोरखंड आदी साधनांचा वापर करुन सकाळी दहा वाजता दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

Story img Loader