मतदार संख्येने देशात सर्वात मोठा असणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदान गुरुवारी आटोपल्यानंतर या मतदारसंघातील जय पराजयाच्या चर्चेला उधाण आले असून, मोदींच्या लाटेमुळे राष्ट्रवादीचे संजीव नाईक एक ते दीड लाख मतांनी पराजित होतील, तर नाईक पाच ते पंचवीस हजार मतांनी विजयी होतील, असे दोन मतप्रवाह समोर आले आहेत.
नाईक यांची सर्व मदार नवी मुंबई या त्यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या एकूण तीन लाख ८१ हजार ९५७ मतांवर आहे. त्यामुळे पुढील २१ दिवस (१६ मेपर्यंत) नाईक विजयी होणार की शिवसेन-भाजप महायुतीचे राजन विचारे, याची जोरदार चर्चा होणार आहे. मुंबई, ठाण्यातील मतदान गुरुवारी झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघात ५३ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. यात या मतदारसंघाचे नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदार संघ असलेल्या ऐरोली व बेलापूर मतदारसंघांत अनुक्रमे एक लाख ९६ हजार ५०० (५०.९७ टक्के) व एक लाख ८५ हजार ४५७ (५०.८२टक्के) मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मीरा-भाईंदर मतदारसंघातदेखील ५४.६९ टक्के मतदान झाले आहे. या दोन मतदारसंघांवर राष्ट्रवादीच्या नाईक यांची भिस्त असून, या तीन मतदारसंघांत झालेल्या एकूण पाच लाख ५९ हजार ९८७ मतांवर अधिक आशा आहे. त्यामुळे पुढील २१ दिवस केवळ चर्चा होणार असून, यात महायुतीचे विचारे विजयी होणार का, यापेक्षा आघाडीचे नाईक यांचे काय होईल, याची चर्चा जास्त आहे.
नाईक २५ हजार मतांनी विजयी होतील असा विश्वास माजी नगरसेवक जे.डी. कोळी यांनी व्यक्त केला आहे, तर विचारे दीड लाख मताधिक्य घेतील असे शिवसेनेचे नेते विठ्ठल मोरे ठाणपणे सांगत आहेत. नाईक यांचा नवी मुंबई विकासात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे, पण मोदी यांच्या लाटेत त्यांचा पराजय झाला तर तो नवी मुंबईचा पराजय असणार असून, शहराचे दुर्दैव म्हणावे लागणार आहे, असे मत ब प्रभाग समितीचे सदस्य डी. डी. कोलते यांनी व्यक्त केले. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी १२ टक्के अर्थात अडीच लाख मतदान वाढले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात थोडी खुशी जादा गम आहे.
यावर उलट सुलट चर्चा होत असून, हे मतदान नाईक कुंटुबीयांनी नोंदणी केलेल्या मतदारांचे असल्याचे म्हटले जात आहे. नवमतदार संपूर्णपणे विचारे यांना मतदान करतील यावर काँग्रेसच्या नामदेव भगत यांचा विश्वास नाही.
नाईक पाच ते दहा हजार मतांनी निवडून येतील असे त्यांचे मत आहे. तीन मतदारसंघांत झालेले मतदान विशेषत: मीरा-भाईंदर या ख्रिश्चन व मुस्लीमबहुलात झालेल्या मतदानावर नाईक यांना भरवसा आहे. याशिवाय पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबईतील नगरसेवकांनी जास्त मतदान करण्यासाठी घेतलेले परिश्रम आणि नाईक कुटुंबीयांचा व्यक्तिगत संपर्क यावर नाईक यांना विजयाची खात्री वाटत आहे, तर मोदी लाट आणि ठाण्यातील तीन मतदारसंघांत झालेले विक्रमी मतदान विचारे यांना तारणारे असल्याचे महायुतीला वाटते. त्यात गतनिवडणुकीत मनसेने घेतलेली एक लाख ३४ हजार मते यावेळी त्यांना पडणार नसून, केवळ ५०-६० हजार मतांवर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे विचारे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तृतीयपंथीयांचे मतदान
सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांना स्वतंत्र ओळख देणारा अधिकार बहाल केल्यानंतर पहिल्यांदाच ठाणे लोकसभा मतदारसंघातील १६ तृतीय पंथीयांनी मतदानाचा अधिकार बजावल्याचे दिसून येत आहे. हे सर्व मतदार कोपरी गावातील असून, ते ऐरोली विधानसभेत येतात. ठाणे जिल्ह्य़ात ही संख्या ४१ असून, त्यात डहाणू मतदारसंघातील २५ जण आहेत.