नवीन गाडय़ा, सिग्निलग यंत्रणा, विद्युतप्रवाह यंत्रणा याबाबत आतापर्यंत नेहमीच सापत्न वागणूक मिळालेल्या हार्बर रेल्वे मार्गावर नजीकच्या भविष्यात दर दोन मिनिटांनी गाडय़ा सुटणे शक्य होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या कॅब सिग्निलग प्रणालीचे काम एमआरव्हीसीमार्फत सुरू झाले असून सध्या एमआरव्हीसी त्याबाबतचा आराखडा तयार करीत आहे. तब्बल दहा हजार कोटी रुपयांची ही प्रणाली गाडय़ांमध्ये बसविल्यानंतर सध्याचे खांबांवरील सिग्नल काळाच्या पडद्याआड जाणार आहेत.
मुंबईच्या उपनगरीय मार्गामधील मागासलेला मार्ग, म्हणून हार्बर मार्गाकडे पाहिले जाते. सर्वत्र १२ डब्यांच्या गाडय़ा धावत असताना या मार्गावर अजूनही ९ डब्यांच्याच गाडय़ा चालवल्या जातात. तसेच दोन फेऱ्यांमध्येही किमान पाच ते कमाल १२ मिनिटांचे अंतर आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासी नेहमीच या सापत्न वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करीत असतात. मात्र आता हार्बर मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी या मार्गावर कॅब सिग्निलग प्रणाली येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी दिली.
सध्या पश्चिम रेल्वेवर गर्दीच्या वेळी दर तीन मिनिटांनी एक फेरी चालवली जाते. मात्र आता हार्बर मार्गावर ही कॅब सिग्निलग प्रणाली लागू झाल्यावर दर दोन मिनिटांनी फेऱ्या सुटणे शक्य होईल, असे ब्रिगेडिअर सूद यांनी सांगितले. तसेच ही प्रणाली लागू झाल्यावर खांबांवरील सिग्नल यंत्रणा अनावश्यक ठरणार असून सिग्नल यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाणही कमी होईल, असा दावा त्यांनी केला. या प्रणालीबाबतची कार्यवाही मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे केली जात आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. हा प्रकल्प पाच ते दहा हजार कोटी रुपयांचा असून तो पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल, असेही ब्रिगेडिअर सूद यांनी स्पष्ट केले.
कॅब सिग्निलग म्हणजे?
प्रत्येक गाडीतच मोटरमन आणि गार्ड यांच्या केबिनमध्ये कॅब सिग्निलग प्रणालीद्वारे सिग्नल यंत्रणा असते. या यंत्रणेवर त्या रूळावरील सर्व गाडय़ांची स्थिती मोटरमन व गार्डला कळू शकते. त्या गाडय़ांचा वेग, मागील व पुढील गाडीतील अंतर आदी सर्व माहिती त्यांना बसल्याजागी मिळते. त्यामुळे सध्या खांबांवरील सिग्नल ओलांडल्यानंतर काही काळानंतर मोटरमन व गार्डला मिळणारी सूचना त्यांना कॅब सिग्निलगमध्ये तात्काळ मिळते. परिणामी एका गाडीने सिग्नल ओलांडला की, लगेचच त्यामागील गाडी सुटू शकते.