‘महापौर आपल्या दारी’ हा उपक्रम महिनाभरापासून थंडावला असल्याचा मुहूर्त साधून उपमहापौरांनी आता जनता दरबाराचे आयोजन करत सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पालिकेच्या सत्तेचे आपणही वाटेकरी असलो तरी मनसेकडून सातत्याने डावलले जात असल्यामुळे बहुदा भाजपने मनसेच्या उपक्रमाला समांतर ठरेल, अशा उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे.
शहरातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी भाजप कार्यालयात नुकताच आयोजित केलेल्या जनता दरबारावरून त्याचीच प्रचिती येते. यावेळी त्यांनी नागरिकांशी व्यक्तिगत स्वरूपात संवाद साधला. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासनही कुलकर्णी यांनी दिले. भाजपतर्फे पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. प्रत्येक महिन्यातील दर मंगळवारी उपमहापौर जनतेशी संवाद साधण्यासाठी वेळ देणार आहेत. शहरातील नागरीक वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असून त्या समस्यांचे निराकरण होत नाही. या पाश्र्वभूमीवर उपमहापौरांनी जनता दरबार सुरू करून जनतेसमोर नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे भाजपचे म्हणणे आहे. महापालिकेत सत्ता मिळवून दीड वर्षांचा कालावधी होत असताना भाजपला ही उपरती झाली आहे. शहरवासीय विविध समस्यांनी ग्रस्त असून त्यांच्या समस्या सुटत नसल्याची कबुलीही भाजपने दिली आहे. म्हणजे, समस्या न सुटण्यामागे सत्ताधारी म्हणून भाजपलाही काही अंशी दोषी धरावे लागेल.उपमहापौरपदावर आरूढ होऊन इतका काळ लोटूनही म्हणावी तशी छाप पडत नसल्याने बहुदा ही संकल्पना पुढे आली आहे. महापौर अॅड. यतिन वाघ यांनी काही महिन्यांपूर्वी ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रम सुरू केला होता. त्या माध्यमातून महापौरांनी आजवर १५ प्रभागांत भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यातील किती समस्यांची सोडवणूक झाली ही बाब गुलदस्त्यात असताना उपमहापौरांनी तसाच मार्ग अनुसरला आहे. साधारणत: महिनाभरापासून ‘महापौर आपल्या दारी’ हा उपक्रम थंडावला आहे. त्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी भाजपच्या उपमहापौरांनी ही योग्य वेळ असल्याचे लक्षात घेऊन त्या दिशेने पावले टाकली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा