ठाणे शहरापाठोपाठ आता वाहतूक पोलिसांनी मुंब्रा परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक मार्गामध्ये प्रायोगिक तत्वांवर बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पारसिकनगर येथून येणाऱ्या अत्यावश्यक वाहनांना स्थानक परिसरात ठराविक वेळेत बंदी घालण्यात आली असून ही वाहने उड्डाण पुलामार्गे जाणार आहेत. येत्या तीस दिवसांसाठी हा बदल लागू करण्यात आला आहे.
ठाणे शहराला वाहतूककोंडीचा विळखा बसला असून यातून ठाणेकरांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदलांचे प्रयोग हाती घेतले. तीन पेट्रोल पंप, वंदना टी स्टॉल आणि राममारूती रोड परिसरात प्रायोगिक तत्वांवर सुरू करण्यात आलेला वाहतूक बदलांचा प्रयोग कायम स्वरूपी करण्यात आला. मात्र, त्यानंतर नितीन कंपनी येथील सव्‍‌र्हिस रोडवर सुरू करण्यात आलेला वाहतूक बदल नागरिकांच्या विरोधामुळे वाहतूक पोलिसांना गुंडाळावा लागला. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारचे प्रयोग सातत्याने राबविले जात आहेत. मुंबा रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा तसेच वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूककोंडी होऊ लागली आहे. मुंब्रा शहरातील मुख्य रस्त्यांवर शाळा तसेच महाविद्यालये असून येथील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बसेसची स्थानक परिसरातून मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरूअसते. तसेच टोल वाचविण्यासाठी बहुतेक वाहने उड्डाणपुलामार्गे न जाता स्थानक परिसरातूनजात असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी मुंब्रा स्थानक परिसरात प्रायोगिक तत्वांवर वाहतूक मार्गातील बदलांचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानक परिसरातून अत्यावश्यक वाहनांना सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या ठराविक वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच ही अधिसूचना पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका यांना लागू राहणार नाही.
स्थानक परिसरातील रस्त्यालगत हॉटेल्स, दुकाने असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत असल्याने प्रभाग समिती कार्यालय ते पेट्रोलपंप ब्रीजच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग झोन करण्यात आले आहे, असे वाहतूक शाखेने कळविले आहे. तसेच या संदर्भात काही तक्रारी आणि सूचना असल्यास लेखी स्वरुपात कळविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Story img Loader