क्रीडा स्पर्धेसाठी शाळेची रीतसर परवानगी न घेताच दहावीच्या विद्यार्थिनींना जालना येथे घेऊन जाणाऱ्या शहरातील एका शाळेमधील शिक्षकाला मुख्याध्यापिकेने दूरध्वनी करून परत बोलावले. मात्र, या प्रकाराची या मुलींच्या पालकांमध्ये शनिवारी तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यातून संतप्त पालकांनी ही शाळा शनिवारी बंद पाडली. दरम्यान, या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दिल्याची माहिती मिळाली. याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार जालना येथे हँडबॉल स्पर्धेसाठी हा शिक्षक दहावीच्या १५-१६ मुलींना घेऊन रेल्वे स्थानकावर गेला होता. दहावीच्या परीक्षेत एकूण गुणांमध्ये क्रीडाविषयक गुणांचाही समावेश केला जातो. या अनुषंगाने या मुलींना स्पर्धेसाठी नेण्याचा प्रयत्न असल्याचे समजले. परंतु स्पर्धेसाठी रीतसर परवानगी न घेता अशा प्रकारे विद्यार्थिनींना नेण्यास मुख्याध्यापिकेने विरोध करून लगेच शिक्षकाला दूरध्वनी केला व परत येण्यास सांगितले. हा प्रकार मुलींच्या घरी कळताच पालकांमध्ये खळबळ उडाली. त्यातूनच संतप्त पालकांनी शनिवारी शाळेमध्ये येऊन संबंधितांना जाब विचारला. यावेळी किरकोळ वादावादी झाली. मात्र, पालकांनी संपूर्ण शाळाच दिवसभर बंद पाडली.

Story img Loader