तीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाने संगीतकार भप्पी लाहिरी आणि जीतेंद्र यांना नवसंजीवनी दिली होती. त्यातील ‘नयनो में सपना’ हे गाणं कमालीचं गाजलं होतं. आता या चित्रपटाचा याच नावाने रिमेक येत असून ‘नयनो में सपना’ या गाण्याचं रिमिक्स करण्यात आलं आहे. या गाण्याच्या रिमिक्ससाठी संगीतकार साजिद-वाजिद यांनी किशोरदांच्या वारसदाराला म्हणजे अमितकुमारला पाचारण केलं आणि हे रिमिक्सही एका झटक्यात लोकप्रिय झालं. या मूळ गाण्याची कॅसेट एचएमव्हीने काढली होती, तर याच कंपनीचं नवं रूप असणाऱ्या सारेगामा इंडिया लि.ने या रिमेकच्या सीडीची निर्मिती केली आहे, हाही एक योगायोग. नेहमी अज्ञाताच्या प्रांतात रमणाऱ्या अमितकुमारने खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी या गाण्याची सांगितलेली जन्मकथा..
पिताजींच्या प्रत्येक गाण्याशी माझं भावनिक नातं आहे, ‘नयनो में सपना’ हे गाणंही त्यास अपवाद नाही. त्यामुळे हे गाणं नव्या स्वरूपात गायला मिळालं याचा खूप आनंद झाला. मात्र, त्याचीही एक गंमत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिग्दर्शक साजिद खान आणि संगीतकार साजिद-वाजिद यांचा मला दूरध्वनी आला, ‘एक गाणं रेकॉर्ड करायचं आहे.’ फार चौकशी न करता मी होकार कळविला आणि अंधेरीतील सहारा स्टुडियोत पोहोचलो. तेथे गेल्यानंतर मला समजलं की हे काही नवीन गाणं वगैरे नाहीये, तर पिताजींनीच गायलेल्या ‘नयनो में सपना’ या गाण्याचं रिमिक्स करायचं आहे. साजिद खान यांची माझ्याकडून किती अपेक्षा होती पहा, ‘या गाण्यासाठी आम्हाला किशोरदाच हवे होते, आता ते शक्य नाही. सध्या अनेक तथाकथित व्हॉइस ऑफ किशोर आहेत, मात्र त्यांच्या जवळपास पोहोचणारा एकही गायक नाही. त्यांच्याशी मिळताजुळता कोणाचा आवाज असेल आणि त्यांच्या शैलीत कोणी गाऊ शकणार असेल तर ते केवळ तुम्हीच आहात, म्हणूनच तुम्हाला खास आमंत्रित केलं, शिवाय तुम्ही त्यांचेच वारसदार आहात, असं असताना दुसऱ्या कोणाकडून हे गाणं म्हणून घ्यायची आम्ही कल्पनाही करू शकत नाही.’ साजिदच्या या कौतुकाने मी भारावलो.
सध्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणात बरीच क्रांती झाल्याने आम्ही केवळ तासाभरात हे गाणं रेकॉर्ड केलं. ते ऐकल्यानंतर सर्वाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला, तो मला आजही आठवतोय. साजिद म्हणाला, ‘आता पहा, हे गाणं किती हिट होईल आणि खळबळ उडवून देईल, मूळ गाण्यालाही लोक विसरतील’.. साजिदचे शब्द १०० टक्के खरे ठरले. नवीन गाणी मी फारशी ऐकत नाही, मात्र या गाण्याने ‘दबंग टू’मधील ‘फेव्हिकॉल’लाही मागे टाकलं असं मला सांगण्यात आलं. सर्वसामान्य रसिकांनी व माझ्या चाहत्यांनीही या गाण्याला डोक्यावर घेतलं. यू टय़ूब आणि फॅन पेजवर केवळ एक-दोन नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्यात एकाने म्हटलं की, ‘अमितकुमार बुढ्ढा हो गया है.’ त्याला उत्तर देण्याच्या फंदात मी पडलो नाही. भविष्यातही दणक्यात गाऊनच मी त्याला उत्तर देईन, मात्र मला बुढ्ढा म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की, हा सगळा नशिबाचा खेळ आहे. कोण कधी चमकेल हे आपण सांगू शकत नाही. हे गाणं पिताजी गायले तेव्हा ते ५४ वर्षांचे होते आणि आता मी ६१ वर्षांचा आहे, तरीही मी ते गाणं त्याच ताकदीने आणि जोशात गायलंय, ते सर्वाना आवडलंय, मी कोणाचाही अपेक्षाभंग केलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते हिट झालंय, त्यामुळे अशा टीकेकडे मी लक्ष देत नाही.
पिताजींना जाऊन आता २५ वर्षे झाल्येत, तरीही त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यांचा मुलगा म्हणून बोलत नाही, परंतु त्यांच्यासारखा कलाकार पुन्हा निर्माण होणं हे कठीणच नाही तर अशक्य आहे. त्यांचे चाहते माझ्यात त्यांना शोधतात, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. अमितकुमार आखडू आहे, त्याने स्वत:ला कोंडून घेतलं आहे, तो गाणी नाकारतो.. अशा अनेक अफवा व प्रवाद माझ्याबद्दल या चित्रपटसृष्टीत आहेत, याची मला जाणीव आहे. मात्र, त्यात तथ्य नाही. पिताजी असतानाही पाश्र्वगायक म्हणून मी स्थिरावलो होतो. त्यांच्यानंतर गाणी मिळविण्यासाठी जी गळेकापू स्पर्धा व तत्त्वहीन प्रकार सुरू झाले, ते मला कसे मानवणार? मी किशोरकुमारचा मुलगा आहे. आयुष्यात कधीही, कोणाकडेही गाणी मिळविण्यासाठी मी याचना केली नाही. १० जन्मांत ते शक्य नाही.
स्वत:चं मार्केटिंग मला जमत नाही. तरीही कोणासाठीही मी दरवाजे बंद केलेले नाहीत. आजही कोणी प्रेमाने आणि सन्मानाने बोलावलं तर मी गायला जातो. आता हे गाणं हिट झालंच की! याशिवाय सध्या मी ‘कुमार ब्रदर्स म्युझिक’ या आमच्या नव्या ऑनलाइन म्युझिक कंपनीच्या निर्मितीमध्ये गुंतलोय. या कंपनीचा पहिला अल्बम लवकरच तुमच्या भेटीला येईल. यात आठ गाणी असून ती लीनाजींनी लिहिली आहेत, तर मी संगीतबद्ध केली आहेत. मी आणि सुमीत मिळून हा अल्बम करतोय. याचं नावच आहे, ‘हा मै हू बदनाम’. विशेष म्हणजे सध्या संगीताच्या नावाखाली जो धांगडधिंगा ऐकायला मिळतो, तो यात नसेल. यातील गाणी अतिशय कर्णमधुर आहेत. पाहूया, तुमचा लाडका अमितकुमार पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या व लोकप्रियतेच्या शिखरावर जाईलही!
आधी जिंदगी तो..
दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या किशोरकुमार महोत्सवात अमितने (अमित फार तर ४०-४५ वर्षांचा असेल, असा अनेकांचा समज आहे. मात्र गेल्या वर्षी ३ जुलैला त्याने वयाची साठी पूर्ण केली. त्याला अहो-जाहो करायला अजूनही जीभ रेटत नाही, ही त्याच्या तंदुरुस्तीची कमाल आहे.) धमाल उडवून दिली होती. किशोरदांची अनेक गाणी धांगडधिंग्यासह सादर करताना तो रसिकांशी संवादही साधत होता, आठवणी सांगत होता. असंच एका गाण्यानंतर तो चटकन बोलून गेला, ‘मेरी आधी जिंदगी तो लोगोंने पिताजी और मुझमें की कम्पॅरिझनमेंही गुजर गयी..’ हे ऐकून अंगावर काटा आला. ‘तेरी याद आ रही है’ हे गाणं गायल्यानंतर तो म्हणाला, ‘इस गाने के लिये मुझे पहली और आखरी बार फिल्मफेअर पुरस्कार मिला..’ हे ऐकूनही वाईट वाटलं. केवळ ऑर्केस्ट्रात गाण्याची पात्रता असणारे अनेक जण ‘व्हाइस ऑफ किशोर’ म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत वर्षोनुवर्षे चमकत राहिले आणि किशोरदांच्या या खऱ्याखुऱ्या वारसदाराची कारकीर्द मात्र जोमाने बहरली नाही. या बाप-बेटय़ांच्या चाहत्यांसाठी ही सल फार मोठी आहे.
तीस साल बाद..
तीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाने संगीतकार भप्पी लाहिरी आणि जीतेंद्र यांना नवसंजीवनी दिली होती. त्यातील ‘नयनो में सपना’ हे गाणं कमालीचं गाजलं होतं. आता या चित्रपटाचा याच नावाने रिमेक येत असून ‘नयनो में सपना’ या गाण्याचं रिमिक्स करण्यात आलं आहे.
First published on: 10-03-2013 at 12:39 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After thirty years