ढालेगाव येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावर असणाऱ्या कृषिपंपाची वीज खंडित करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात शनिवारी शेतकरी पुन्हा बैलगाडय़ांसह रस्त्यावर आले. त्यामुळे पाथरी, माजलगाव या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ३ तास बंद राहिली. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेच्या आमदार मीरा रेंगे यांनी केले. आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने ढालेगाव पुलावरून बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला.
ढालेगाव बंधाऱ्याचे पाणी सरकारने पिण्यासाठी आरक्षित केल्याने बंधाऱ्यालगत असणाऱ्या कृषिपंपाची वीज तोडण्याची मोहीम महसूल प्रशासनाने हाती घेतली आहे. आठ दिवसांपासून पाथरी तालुक्यातील रामपुरी, ढालेगाव, वडी यांसह अन्य आठ गावांतील कृषिपंपाची वीज खंडित केली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके संकटात आल्याने शेतकऱ्यांनी वीज खंडित करण्यास विरोध केला आहे. दोन दिवसांपासून या परिसरात शेतकरी बैलगाडय़ांसह रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेनेसह माकप, भाकप व स्वाभिमानी शेतकरी संघटनाही शेतकऱ्यांच्या मदतीला रस्त्यावर आली. आमदार रेंगे व कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी पाथरी-माजलगाव रस्त्यावरील ढालेगाव पुलावर हे आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान पुलावरून एका तरुण शेतकऱ्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अन्य शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, कल्याण रेंगे, उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे, तालुकाप्रमुख रवींद्र धर्मे, माकपचे विलास बाबर, दीपक लिपणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय सिताफळे, सुरेश ढगे, संजय कुलकर्णी, किरण शिंदे, सखुबाई लटपटे, राहुल पाटील आदींसह शेतकरी बैलगाडय़ांसह सहभागी झाले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा