शहरात सोमवारी रात्री उशीरा आणखी एक खून झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्था चव्हाटय़ावर आली आहे. शास्त्रीनगरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या खुनाचे धागेदोरे उकलण्यात चोवीस तास झाले तरी पोलिसांना कसलेच यश आलेले नाही.
रियाज गैबी शेख असे काल रात्री खून असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा खून खंडू कांबळेगटाच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा संशय घेऊन पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू ठेवला आहे. मंगळवारी पुणे व उस्मानाबाद येथे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. वर्षभरापूर्वी उल्हास खंडू कांबळे याचा खून झाला होता. या खुनाचा बदला म्हणून सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रियाज शेख (वय ३५ रा.राजेंद्रनगर) याचा गुप्तीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेमुळे राजेंद्रनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.खंडू कांबळे गटाच्या सात-आठ तरूणांनी रियाजवर हल्ला केला होता. हल्ला करून मारेकरी रिक्षातून पळून गेले होते.     
हल्ल्यानंतर रियाजला सीपीआर रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी इस्पितळात दाखल झाले होते. त्यांनी संशयित आरोपींना पकडण्यासाठी शहरात नाकेबंदी करण्याचे आदेश दिले. राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये खंडू कांबळे गटाच्या आठ जणांवर रियाजच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.    
मंगळवारी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हल्लेखोरांच्या शोधात होते. त्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली. ती पुणे व उस्मानाबाद येथे शोध घेण्यासाठी गेली होती. मात्र पथकाच्या हाती सायंकाळपर्यंत हल्लेखोर लागले नव्हते. सोमवारी रात्री झालेल्या खुनाची आजही शहरात चर्चा सुरू होती. खंडू कांबळे याची पत्नी माजी नगरसेविका छाया कांबळे व तीन मुले यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्याच आठवडय़ात त्यांना दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार केले आहे. तरीही कांबळे समर्थकांनी रियाजचा खून केल्याने त्यांची राजेंद्रनगर परिसरातील दहशत पुन्हा एकदा दिसून आली.

Story img Loader