जिल्हय़ात गेल्या ३-४ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक चांगलेच कात्रीत सापडले आहेत.
सध्या सोयाबीन पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. यंदा जिल्हय़ात वेगवेगळय़ा ठिकाणी सोयाबीन काढणीचे दर एका पिशवीस १ हजार ७०० रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत होते. मात्र, ४ दिवस झालेल्या पावसाने या दरात वाढ होऊन ते ३ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. काढणीसाठी अतिरिक्त खर्च आहेच, शिवाय पावसामुळे मालाची प्रतही घसरते आहे. अनेक त्रासातून सोयाबीनची रास करून बाजारात आणल्यानंतर बाजारात पुन्हा उत्पादकांची कोंडी केली जात आहे. यंदा सोयाबीनचा भाव ३ हजार २०० रुपयांच्या खाली येणार नाही, अशी हमी कीर्ती उद्योग समूहाच्या वतीने महिनाभरापूर्वीच देण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने सोयाबीनचा हमीभाव २ हजार ५६० रुपये आहे. कीर्ती उद्योग समूहाचे गुरुवारचे दर क्विंटलला ३ हजार २७० रुपये होते. मात्र, हे दर मालाच्या उच्चदर्जाचे आहेत. गुरुवारी आडत बाजारपेठेत २ हजार ७०० रुपयांपासून सोयाबीनची खरेदी चालू होती.
बाजारात आलेल्या मालात ओलाव्याचे प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा अधिक असल्यामुळे हा माल जास्त दिवस टिकत नाही. अशा मालाला खरेदीदारांची मागणी नाही, अशी कारणे सांगून खरेदीदार मालाची खरेदी करायला तयार नाहीत. रब्बी हंगामासाठी बी-बियाणे व पेरणीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना पसा लागत असल्यामुळे त्यांना बाजारपेठेत माल विकण्याशिवाय गत्यंतर नसते. परंतु शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन त्यांना िखडीत गाठण्याचे काम व्यापाऱ्यांकडून सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी होत आहे. सोयाबीनमध्ये ओलावा आहे, असे कारण देत शेतकऱ्यांची क्विंटलला किमान ३०० रुपयांपेक्षा अधिकची लुबाडणूक केली जात आहे. आधीच सरकार सोयाबीनला भाव अधिक देता येत असतानाही बाजारपेठेत हस्तक्षेप करून भाव वाढवून देण्यास प्रयत्न करीत नाही. शेतकरी संघटनेचे नेते मोच्रे व निवेदने देऊन स्वतची प्रसिद्धी करून घेण्यातच मग्न आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. याचाच लाभ बाजारपेठेत उठवला जात आहे. एनसीडीएक्समध्ये नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत सोयाबीनचे भाव ३ हजार ६०० रुपयांपर्यंत आहेत. शेतकऱ्यांनी थोडासा धीर धरल्यास सोयाबीनला चांगला भाव मिळू शकतो. सरकारने शेतीमाल तारण योजनाही लवकर उपलब्ध केल्यास त्याचाही लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल.
वार्षकि सरासरीच्या ९५ टक्के पाऊस
लातूरकरांना आजही आठवडय़ाला पिण्याचे पाणी मिळत असले, तरी संपूर्ण जिल्हय़ात वार्षकि सरासरीच्या ९५ टक्के पाऊस मात्र झाला आहे. देवणी, अहमदपूर व उदगीर तालुक्यांत वार्षकि सरासरीच्या अधिक पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठपर्यंत २४ तासांत जिल्हय़ात सरासरी १०.७९ मिमी पाऊस झाला. जळकोट तालुक्यात २७.५०, उदगीर २५ तर अहमदपूर तालुक्यात २२ मिमी पाऊस झाला. या मोसमात जिल्हय़ात सरासरी पाऊस ७६०.५४ मिमी पाऊस झाला. जिल्हय़ाची वार्षकि सरासरी ८०२ मिमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा