बेकायदेशीररित्या करण्यात आलेल्या वीज दरवाढीविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वीज देयकांची होळी करण्यात येणार आहे. या आंदोलनात नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचा निर्णय यासंदर्भात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतीचे सचिव विलास देवळे हे होते. दोन वर्षांत १२ वेळा वीज दरवाढ झाली असून, सद्यस्थितीत खापरखेडा व इतर वीज संचांच्या निर्मितीत विलंब झाल्याबद्दल जादा १२०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच भारताबाहेरून परदेशी कोळसा आणावा लागल्याने १८०० कोटींचा अधिकचा वीज खर्च, याप्रमाणे एकूण तीन हजार कोटींची वसुली करण्यासाठी कोणतीही जाहीर जनसुनवाणी न घेता वीज ग्राहकांच्या देयकात परस्पर सप्टेंबर २०१३ पासून वसुली सुरू करण्यात आली असल्याचा आरोप ग्राहक पंचायतीने केला आहे. यामुळे वीज घरगुती वापरासाठी २४ टक्के, व्यापारी २७, उद्योग २८ आणि शेती ८८ टक्के या दराने मिळणार आहे. त्यामुळे वीज दरात शेतीसाठी ०.६० पैसे प्रति युनिटवरून १.३० रुपये व औद्योगिकसाठी ७.५० वरून १०.५ प्रति युनिट अशी वाढ होणार आहे. या पाश्र्वभूमीवर गुजरातमध्ये कृषी पंपासाठी ०.५० पैसे, औद्योगिकसाठी ५.६० रुपये प्रति युनिट असा दर आहे. महाराष्ट्रातील वीज खरेदी दर पुढीलप्रमाणे- नाशिक केंद्र ३.६० रुपये, भुसावळ ३.९०, खापरखेडा ४.४० रुपये तर गुजरातमधील दर एनटीपीसी २.५६ रुपये, टाटा/ मुद्रा २.७८ रुपये, एनपीसीएल २.६७ रुपये व अदाणी २.८३ याप्रमाणे कमी आहेत. वीज वितरण कंपनीची थकबाकी २० हजार कोटी (मुळा प्रवरा दोन हजार कोटी), वीज गळती व चोरी १५ हजार कोटी, निविदेतील भ्रष्टाचारामुळे १२ हजार कोटी असा सर्व बोजा वाढला आहे. त्याचा भरूदड वीज ग्राहकांना सोसावा लागणार आहे. ही महाग वीज घेऊनही वीज वितरण व्यवस्था निकृष्ट दर्जाची आहे. खेडय़ात तर खांब टाकण्यासाठी १२०० रुपये, रोहित्र बदलण्यासाठी, तारा टाकण्यासाठी, सर्व वस्तींवर रात्री वीज देण्यासाठी खुलेआम पैशांची मागणी केली जाते. शेतकऱ्यांना अंदाजे वीज देयके दिली जातात. त्यात वापराच्या चार पट अधिक रक्कम दाखविली जाते, असे आरोपही ग्राहक पंचायतीने केले आहेत. उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रात १०.०५ रुपये प्रति युनिट दर आहे. त्यामानाने गुजरात ५.६०, कर्नाटक सहा रुपये, आंध्र प्रदेश सहा रुपये, छत्तीसगड ४.६० रुपये, गोवा ४.३० रुपये याप्रमाणे कमी दर आहेत. त्यामुळे या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व ग्राहकांनी वीज देयकांची होळी करावी, असे आवाहन विलास देवळे, सुहासिनी वाघमारे, अनिल नांदोडे, कृष्णा गडकरी आदींनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा