महिला व बाल कल्याण विभागाकडील बालसेवी संस्थांच्या अनुदान वाटपात अधिकारी करत असलेल्या साखळी पद्धतीच्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी खात्याच्या मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मोटारीसमोर बालगृह चालवणा-या एका वृद्ध संस्थाचालकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडला.  आज दुपारी नगर शहरात ही घटना घडली.
बाबूराव रामभाऊ गिरी (वय ६९ रा. करोडी, पाथर्डी) असे या संस्थाचालकाचे नाव आहे. ते टाकळी खंडेश्वरी (ता. कर्जत) येथे हरिओम बालगृह चालवतात. या भ्रष्टाचाराला विरोध केल्याची शिक्षा म्हणूनच अधिका-यांनी हे बालगृह बंद केल्याची गिरी यांची तक्रार आहे. गिरी यांच्या पाठिंब्यासाठी व बाल कल्याण विभागातील अधिका-यांच्या विरोधात जिल्ह्य़ातील संस्थाचालकांनी नुकताच मोर्चाही काढला होता. याशिवाय काही संस्थाचालकांनी अधिकारी व कर्मचारी कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली होती. तरीही मंत्री किंवा वरिष्ठ अधिका-यांनी दखल घेतली नाही.
महिला व बाल कल्याणमंत्री वर्षां गायकवाड आज दुपारी शहर जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यासाठी नगरमध्ये आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यातील भाषण आटोपताच आपल्या मोटारीत बसत असतानाच, समोरून घोषणा देत आलेल्या गिरी यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. मात्र पूर्वसूचना मिळालेली असल्याने पोलीस तैनात होते, त्यांनी लगेच गिरी यांना ताब्यात घेतले. मात्र मंत्री गायकवाड न थांबता निघून गेल्या. तत्पूर्वी मेळाव्यात ‘स्नेहालय’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना गिरी यांचे निवेदन दिले होते. आपल्या भाषणात त्याची दखल घेत गायकवाड यांनी निवेदनातील तक्रारींची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. बालगृहांचे निकष, त्यांची पात्रता, तपासणी याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या भ्रष्टाचारात सहभागी अधिकारी, कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करावेत, हा संघटित स्वरूपाचा गुन्हा असल्याने संबंधितांना मोका कायदा लावावा, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी सध्याची पद्धत बंद करुन आयुक्तालयातूनच संस्थेच्या बँक खात्यात अनुदान जमा करावे, वाढत्या महागाईत अनाथ मुलांचा ९५० रुपयांत सांभाळ करणे शक्य होत नाही ते वाढवून दरमहा किमान ३ हजार करावे, बालगृहातील कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे आदी मागण्या गिरी यांनी निवेदनात केल्या आहेत.

Story img Loader