उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उठलेले वादळ ग्रामीण भागात अद्यापही शमण्याचे नाव नाही. नाशिक जिल्ह्य़ातील पिंपळगाव व जळगाव जिल्ह्य़ातील चोपडा येथे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
माफीनामाऐवजी अजित पवार यांनी राजीनामाच द्यावा, असे निवेदन चोपडय़ातील शिवसेना, भाजप, मनसे, रिपाइं या पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार कर्तारसिंग गोठवाल यांना दिले. निवेदनावर विकास पाटील, देवेंद्र सोनवणे, महेंद्र धनगर, दीपकसिंग जोहरी, रवींद्र पाटील आदींची स्वाक्षरी आहे.
दरम्यान पिंपळगाव बसवंत येथेही दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे सोडून पाणी प्रश्नावर बेताल व बेजबाबदार विधाने करत अवघ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची टिंगल करणाऱ्या अजित पवार यांच्या विरोधात शहर मनसेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात म्हणून पिंपळगावचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांना निवेदन देण्यात आले.
मनसेचे निफाड तालुका अध्यक्ष प्रकाश गोसावी, शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. शहर मनसेच्या वतीने या संदर्भात निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वसामान्यांमध्ये आपल्या गुंडगिरीच्या जोरावर दहशत पसरविली आहे. दुष्काळ व टंचाईच्या अस्मानी संकटाने जनता भयभीत झाली असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होणाऱ्या हाणामारीच्या बातम्या येतात.
कळस म्हणजे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी दुष्काळी परिस्थितीचे भान न ठेवता शेतकऱ्यांची मस्करी करत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. हा प्रकार महाराष्ट्रातील शेतकरी कदापि सहन करणार नाहीत तसेच वादग्रस्त विधान करत शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्य़ा उपमुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याने त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी शिवमूर्ती खडके, राजेंद्र भवर, मच्छिंद्र शेवरे, रवींद्र बदादे आदी उपस्थित होते.
अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उठलेले वादळ ग्रामीण भागात अद्यापही शमण्याचे नाव नाही. नाशिक जिल्ह्य़ातील पिंपळगाव व जळगाव जिल्ह्य़ातील चोपडा येथे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
First published on: 13-04-2013 at 12:41 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation against ajit pawar