बडय़ा कर्जदारांची वसुलीसंदर्भात गय करू नये तसेच वसुलीव्दारे रिझव्‍‌र्ह बँकेचे र्निबध लवकर काढले जातील याकडे लक्ष द्यावे, अन्यथा संचालक मंडळ व बडय़ा कर्जदारांविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा नाशिक ठेवीदार हितसंवर्धन तथा बचाव समितीने येथील श्री गणेश सहकारी बँकेस दिला आहे.
गणेश बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने र्निबध लादल्याने ठेवीदार व सभासदांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमिवर ठेवीदार बचाव समितीच्या प्रतिनिधींनी बँकेच्या कार्यालयात अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. ठेवी परत मिळत नसल्याबद्दल अनेकांनी समितीकडे गाऱ्हाणे मांडले असल्याची तक्रार अ‍ॅड. तानाजी जायभावे, प्रा. व्ही. एस. चव्हाण, बी. डी. घन, आर. डी. पाटील, ज्ञानेश्वर वाघ, एस. वाय. मोगरे आदिंनी केली. बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकेच्या रोखता व तरलतेचे प्रमाण कमी झाल्याचे तसेच ठेवी व कर्ज वितरण यांचे प्रमाण रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांप्रमाणे राखले गेले नसल्याचे मान्य केले. दुष्काळी परिस्थितीचे कारण पुढे करून काही बडय़ा कर्जदारांनी हेतूत: कर्ज थकविल्याचेही त्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. बँकेचे कर्मचारी वसुलीसाठी प्रयत्नशील असून महिन्याभरात तीन कोटींची वसुली करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. बँक आर्थिक व्यवहारासंदर्भात विविध मुद्यांवर मागितलेली माहिती आठवडय़ाच्या आत देण्याची मागणी समितीच्या प्रतिनिधींनी केली. पंधरवडय़ाच्या आत २५ बडे कर्जदार, बँकेचे पदाधिकारी यांच्या समक्ष आपली बैठक आयोजित करण्याची मागणी समितीने केली. कर्ज वसुलीसंदर्भात बडय़ा कर्जदारांची गय करू नये, कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देणे, तडजोड करणे हे प्रकार टाळावेत, असा सल्ला समितीच्या वतीने बँकेचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांना देण्यात आला. टेवीदारांच्या हिताचे रक्षण व्हावे तसेच बँक लवकरात लवकर नियमितपणे सुरू व्हावी हीच आपली भूमिका असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.  

Story img Loader