शिक्षणाचे व्यापारीकरण विरोधी मोहिमेंतर्गत उद्या, शनिवारी विविध समविचारी संघटनांच्यावतीने दुपारी २.३० वाजता संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण महत्त्वाचा व शिक्षणाचा पाया असून स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद, जिल्हा परिषद, महापालिका यांना ही जबाबदारी पार पाडावी लागते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या संस्थांनी चांगल्याप्रकारे ही जबाबदारी पार पाडली आहे.
लाखो डॉक्टर्स, अभियंता, प्राध्यापक, वैज्ञानिक आणि साहित्यिक लेखक याच सामान्य शाळांची देण आहेत. या सर्व समान व दर्जेदार शिक्षणाच्या शाळा एक योजनाबद्ध षडयंत्राद्वारे नष्ट करण्याचा सत्ताधारी वर्गाचा डाव आहे.  शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावणे, त्या हेतूने तेथील शिक्षकांना शैक्षणिक कामापासून हटवून इतर गैर शैक्षणिक कामात जुंपवणे, आवश्यकतेनुसार शिक्षक वर्ग न देणे इत्यादी याच प्रकारची षडयंत्रे आहेत. एकीकडे स्वत: या शाळेतील शैक्षणिक दर्जा कमी करणे व दर्जा उंचावण्याचे कारण देऊन त्यासाठी या शाळांना त्यांची कोटय़वधींची मालमत्ता स्वयंसेवी संस्था आणि खाजगी कंपन्यांना हस्तांतरित करण्याचे नवीन कटकारस्थान सत्ताधारी वर्गाने आखल्याचा आरोप समविचारी संघटनांनी केला आहे.