जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांच्या मनमानी व गैरकारभाराच्या विरोधात सोमवारपासून मालेगाव तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले.
शिक्षणाधिकारी कोणत्याही अन्यायग्रस्त कर्मचाऱ्याच्या पत्रास उत्तर देत नाही, मात्र अन्याय करणाऱ्या संस्थाचालकांच्या पत्र व्यवहाराला त्वरित खुलासा पत्र देऊन समाधान करतात, अशी तक्रार आंदोलकांनी केली. सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांना कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता संस्थाचालकांच्या राजकीय दबावाला बळी पडून त्यांच्या निलंबनाचा आदेश दिला. राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक, मुख्याध्यापकांची यादी त्यांच्याकडून संमती घेऊन तयार करण्याची जबाबदारी ही नियमानुसार शिक्षणखात्याची आहे. परंतु, शिक्षण विभागाने तशी कोणतीही यादी तयार केली नाही. उलट संस्थाचालकांकडून त्यांच्या मर्जीची नावे टाकून यादीवर स्वाक्षरी करून यादी तयार करण्याचा फार्स रचल्याची तक्रारही आंदोलकांनी केली. काही संस्थांच्या गैरकारभाराविरुद्ध पुरावे देऊनही कारवाई न करणे, अनुकंपावरील नियुक्तांना शासनाची बंदी नसूनही मान्यता न देणे, अशा नियुक्त्या न देणाऱ्या संस्थांवर शिस्त भंगाची कारवाई न करणे, राजकीय दबावाला बळी पडून नियमबाह्य आदेश देणे, आदी तक्रारी निवेदनात करण्यात आल्या आहेत. या आंदोलनास अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा शिक्षकेतर संघटना आदींनी पाठिंबा दर्शविल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

Story img Loader