पाकिस्तान आणि चीन या देशांच्या पंतप्रधानांच्या प्रतीकात्मक पुतळय़ांना सोमवारी हिंदुप्रेमी संघटनांच्या वतीने जोडे मार आंदोलन आणि चिनी बनावटीच्या वस्तूंची होळी करण्यात आली. चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले.     
पाकच्या ताब्यात असणारा मच्छीमार सरबजित सिंग यांची पाकच्या कारस्थान राज्यकर्त्यांनी नियोजनपूर्वक तुरुंगात हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ येथील शिवाजी चौकात सोमवारी हिंदुप्रेमी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पाकचे पंतप्रधान असीफअली झरदारी आणि चीनने भारतात १९ किलोमीटर घुसखोरी करून पाच तंबू बांधल्याप्रकरणी चीनचे पंतप्रधान ली कछियांग यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला तसेच या दोन्ही देशांच्या ध्वजाला जोडे मार आंदोलन करण्यात आले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.    
पाकिस्तानच्या खितपत पडलेल्या २७० भारतीय कैद्यांना पाकिस्तानने सोडून द्यावे, पंतप्रधानांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पाकिस्तानशी असणारे सर्व व्यावहारिक संबंध तोडून टाकावेत आदी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात हिंदू जनजागरण समितीचे शिवानंद स्वामी, डॉ. मानसिंग शिंदे, सुधाकर सुतार, हिंदू एकता आंदोलनाचे प्रांत उपाध्यक्ष दिलीप भिवटे, शिवाजीराव ससे, हिंदुराव शेळके, नंदू सुतार, नंदू अहिर, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे, श्री शिवप्रतिष्ठानचे बिपीन खेडकर, शरद माळी, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव आदी सहभागी झाले होते.
 

Story img Loader