सांगली-इस्लामपूर रोडवरील टोल नाक्यावर ‘आम्ही टोल देणार नाही’ या स्टिकरचे वाटप करीत कृती समितीच्यावतीने शनिवारी २ तास आंदोलन केले. या आंदोलनात केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, महापौर श्रीमती कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाइं कार्यकत्रे सहभागी झाले होते. बापूसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टोल हटाव कृती समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये राजकीय पक्षाबरोबरच वाहतूकदार संघटनाही सहभागी आहेत.
कृष्णा नदीवर आयुर्वनि पुलाला पर्याय म्हणून बायपास रोडने नवीन पूल उभारणी अशोका बिडकॉन मार्फत खासगीकरणातून उभारण्यात आली. या पुलावरील वाहतुकीसाठी सांगलीवाडी या ठिकाणी टोल आकारणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने व्याज दरातील तफावतीच्या कारणावरून २३ जुल २०१३ रोजी टोलवसुली बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र शासनानेच हा निर्णय तत्काळ फिरवून २२ जून २०१५ पर्यंत टोलवसुलीस परवानगी दिली.
पर्यायी पुलासाठी ७ कोटी ५० लाख रुपये खर्च करणाऱ्या ठेकेदार कंपनीने टोलवसुलीतून आतापर्यंत सुमारे ६३ कोटी रुपये गोळा केले आहेत. या शिवाय अतिरिक्त कामापोटी जादा बिलाची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. लवादाने अतिरिक्त खर्च ग्राह्य धरला असून त्यामुळे टोलवसुलीची मुदत वाढण्याची शक्यता आहे. या विरोधात सांगलीतील सर्व पक्ष, कार्यकत्रे एकत्र आले आहेत.
दरम्यान, या टोलप्रश्नी कृती समितीची बठक पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी सायंकाळी अस्मिता बंगल्यात बोलावली आहे. असे उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांनी सांगितले. आजच्या आंदोलनात मनसेचे माजी आ. नितीन िशदे, शिवसेनेचे बजरंग पाटील, भाजपाचे पृथ्वीराज पवार, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेश दुधगांवकर, मदन पाटील युवा मंचाचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. टोलनाक्यावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कंपनीने आंदोलन लक्षात घेऊन टोलवसुलीही काही काळासाठी स्थगित केली होती.
सांगली-इस्लामपूर रोडवरील टोलनाक्याविरोधात आंदोलन
सांगली-इस्लामपूर रोडवरील टोल नाक्यावर ‘आम्ही टोल देणार नाही’ या स्टिकरचे वाटप करीत कृती समितीच्यावतीने शनिवारी २ तास आंदोलन केले.
First published on: 19-01-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation against sangli islampur toll