एलबीटी विरोधातील व्यापार बंदचे आंदोलन कोल्हापुरातील व्यापारी उद्या बुधवारपासून मागे घेणार आहेत. उद्यापासून शहरातील व्यापार पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. बंदमुळे कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची सुमारे ५५० कोटी रुपयांची तर राज्यातील व्यापाऱ्यांची ३५ हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थानिक संस्था कराविरुद्ध कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी गेल्या ११ दिवसांपासून आपले व्यवहार बंद ठेवले होते. व्यापार बंद काळामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जात होती. सोमवारी रात्री झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी सायंकाळी अचानक व्यापार बंद मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली.
कोरगावकर म्हणाले, १९ मे रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात व्यापारी प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये जकात, एलबीटी, व्हॅट असा कोणताही कर नको यावर एकमत झाले होते. एलबीटीच्या आंदोलनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. ते या संदर्भात आज फोन करणार होते, मात्र तो झाला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २४ मे रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनुसार बुधवारपासून बंद मागे घेण्याचे ठरले आहे.
२४ मे रोजी व्यापाऱ्यांची व्यापक बैठक मुंबईत होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी करावयाच्या चर्चेचा मसुदा निश्चित केला जाणार आहे. तो मुख्यमंत्र्यांनी मान्य केला नाही, तर आंदोलनाचा नव्याने विचार केला जाणार आहे. एलबीटी विरोधातील आंदोलनासाठी सत्तारूढ आघाडीने सहकार्य केले नसल्याने भाजपा-शिवसेनेची मदत घ्यावी लागली, असेही ते म्हणाले.
कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
एलबीटी विरोधातील व्यापार बंदचे आंदोलन कोल्हापुरातील व्यापारी उद्या बुधवारपासून मागे घेणार आहेत. उद्यापासून शहरातील व्यापार पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
First published on: 22-05-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation back from today against lbt in kolhapur