परळी-नगर-रेल्वेमार्गासाठी रेल्वे अंदाजपत्रकात पंधराशे कोटींची तरतूद करावी, या मागणीसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर काळकुटे यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जंतरमंतरवर शुक्रवारी उपोषण सुरू करण्यात आले. छावाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे व नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानांवरही निदर्शने करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
बीड-नगर जिल्ह्य़ांना जोडणाऱ्या परळी-बीड-नगर या प्रलंबित रेल्वेमार्गासाठी रेल्वे अंदाजपत्रकात भरीव तरतूद करावी, या मागणीसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर काळकुटे यांच्या नेतृत्वाखाली मागील २ वर्षांपासून निवेदने, उपोषणे, निदर्शने या मार्गाने आंदोलन सुरू आहे. यंदाही रेल्वे अंदाजपत्रकापूर्वीच लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी थेट दिल्लीत आंदोलन सुरू केले. सकाळी महाराष्ट्र सदनात भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार मुंडे व नगरचे खासदार गांधी यांच्या निवासस्थानांसमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर जंतरमंतर उपोषण सुरू केले. मागण्यांचे निवेदन पंतप्रधान, नियोजन आयोगाच्या उपाध्यक्ष रेल्वेमंत्री व राज्यातील नेत्यांना देण्यात आल्याची माहिती छावाने पत्रकाद्वारे दिली. उपोषणात काळकुटे यांच्यासह नितीन आगवान, दत्ता फाटे, संतोष क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.   

Story img Loader