स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लोकसभेत विदर्भातील दहा खासदार मौन राखून बसले असताना राज्यसभेत बसपा नेत्या मायावती व रामविलास पासवान यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली. उत्तर प्रदेशातील या बडय़ा नेत्यांनी वरिष्ठ सभागृहात स्वतंत्र विदर्भाचे समर्थन केल्याने या आंदोलनाला बळ मिळाले आहे. तेलंगणाची निर्मिती करताना विदर्भावर अन्याय झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय विदर्भ राज्याच्या मंत्रिमंडळाच्या चंद्रपूर येथील बैठकीत घेण्यात आला.
स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीवर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची तेवढी औपचारिकता शिल्लक आहे. मात्र, तेलंगणा राज्य देतांना विदर्भातील नागरिकांवर अन्याय करण्यात आला असून आता विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय प्रतिकात्मक विदर्भ राज्याच्या मंत्रिमंडळाच्या चंद्रपूर येथील बैठकीत घेण्यात आला. या मंत्रिमंडळाची भरगच्च बैठक शनिवारी येथे पार पडली. विदर्भ राज्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथील अधिवेशन काळात विदर्भ संयुक्त कृती समितीव्दारे प्रतिमंत्रिमंडळ तयार करण्यात आले. या मंत्रिमंडळाचे अधिवेशनही नागपुरात पार पडले. या अधिवेशनात विदर्भ राज्याचा अर्थसंकल्पही मांडण्यात आला. त्यानंतर विदर्भ राज्याच्या मागणीकडे राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या चार शहरात जनमत चाचणी घेण्यात आली. याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येत्या ९ मार्चला गडचिरोली येथे जनमत चाचणी घेण्यात येणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्य़ात जनमत चाचणीचा प्रयोग राबविल्यानंतर वेगळ्या विदर्भ राज्याच्या धोरणाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आले.
विदर्भ राज्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भातील ११ जिल्ह्य़ातील खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. मात्र, कोणत्याही मराठी खासदाराने किंबहुना विदर्भातील खासदारांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लोकसभेत मांडला नाही किंवा लावून सुध्दा धरला नाही. याउलट, रामविलास पासवान, बसपाच्या मायावती यांनी राज्यसभेत विदर्भ राज्याची मागणी करताना या मागणीला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात वाचा फोडल्याने विदर्भ राज्याच्या आंदोलनाला बळ मिळाल्याचे अॅड.चटप यांनी सांगितले.
विदर्भ राज्याच्या मागणीला शिवसेनेचा कायम विरोध राहिलेला असून अखंड महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे विधान सेनानेते उध्दव ठाकरे यांनी केले आहे. ज्यांना स्वत:चे घर, पक्ष अखंड ठेवता आला नाही त्यांनी अखंड महाराष्ट्राबाबत बोलू नये, अशी टीका निमंत्रक दीपक निलावार यांनी केली.
आजच्या बैठकीला अॅड. वामनराव चटप, दीपक निलावार यांच्यासह राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अॅड.नंदा पराते, मंगल चिंडालिया, प्रा.पुरुषोत्तम पाटील, राजेंद्रसिंह ठाकूर, किशोर पोतनवार, अंकुश वाघमारे, अण्णाजी राजेंद्रधर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा