आयआरबी कंपनीने सुरू केलेल्या टोल आकारणीविरोधात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. टोल रद्द होईपर्यंत लढा सुरू राहणार आहे. तोपर्यंत सत्ताधाऱ्यांना झोपू दिले जाणार नाही, असा इशारा आंदोलनावेळी ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी दिला. आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.    
शहरातील टोल आकारणी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय टोलविरोधी कृती समितीने घेतला होता. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी शहराच्या विविध भागांतून नागरिक गटागटाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत होते. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवार पेठेतील निवासस्थानापासून मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील महावीर गार्डनच्या कोपऱ्यावर आंदोलनासाठी मंडप उभारण्यात आला होता. टोल देणार नाही, टोलरूपी खंडणीला विरोध करावा अशा आशयाच्या घोषणा दिवसभर दिल्या जात होत्या. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुखांसाठी मंचावर बसण्याची सोय करण्यात आली होती. तेथेच विविध पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींची दिवसभर टोल विरोधातील भाषणे सुरू होती. अन्यायी टोल वसुली करण्याचे स्वप्न धुळीत मिळविले जाईल, कोल्हापूरकरांच्या संयमाचा अधिक अंत न पाहता टोल वसुली बंद करावी अन्यथा शहरात एकही टोलनाका पहायला मिळणार नाही, असा खरबरीत इशारा वक्तयांकडून दिला जात होता.    
खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार राजू शेट्टी, श्रीमंत शाहू महाराज, आमदार क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व आमदार के.पी.पाटील, आमदार डॉ.सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुरेश हाळवणकर, धनंजय महाडिक, रामभाऊ चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, कॉ.दिलीप पवार, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार संपतराव पवार, माजी आमदार सुरेश साळोखे, उपमहापौर परिक्षित पन्हाळकर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.    
आमदार के.पी.पाटील यांनी टोल आकारणीचा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करून शहराला टोलमुक्त केल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पोलिसांना खोटे गुन्हे दाखल करण्याची सवय लागली असली तरी अशा गुन्ह्य़ांची भीती वाटत नाही, असे नमूद करून थोडय़ा दिवसांनी टोलनाके जाळण्याचा इशारा दिला. तर कोल्हापूरकरांच्या संयमामुळे टोलनाके ठिकाणावर असल्याचे आमदार नरके यांनी सांगितले. सायंकाळी टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले.
सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
दिवसभरात बहुतांशी वक्तयांनी सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रिय धोरणामुळे शहरावर टोल लादला गेला असल्याची टिका केली. सत्ताधाऱ्यांना झोपू दिले जाणार नाही, असा उल्लेख करून एन.डी.पाटील यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना सूर्याजी पिसाळ ठरविले. टोल भरून त्यांनी चूक केली असल्याने त्याची लाज वाटायला हवी अशी टिकाही त्यांच्यावर केली. चारचाकी वाहनचालक आंदोलनात दिसत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

Story img Loader