यंत्रमाग कामगार मजुरीवाढ प्रश्नी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी बैठक, आमदार सुरेश हाळवणकर यांचे प्रांताधिकारी कार्यालयात सुरू झालेले बेमुदत ठिय्या आंदोलन व यंत्रमाग कामगारांच्या सभेत तडजोडीच्या टप्प्यावर येण्याची दर्शविलेली तयारी, अशा विविध घडामोडींमुळे इचलकरंजीतील घडामोडींना अचानक वेगवान वळण मिळाले आहे. कामगारांच्या कामबंद आंदोलनाच्या मंगळवारच्या ३८ व्या दिवशी इचलकरंजी शहरात हा प्रश्न मार्गी लागेल, असे आशादायक वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
सोमवारी रात्री प्रांत कार्यालयामध्ये मजुरीवाढीसाठी चर्चा सुरू असतांना दोन तासानंतर आमदार सुरेश हाळवणकर यांनी अचानक ठिय्या आंदोलन सुरू केले. रोजच चर्चा करून निर्णय न घेता बाहेर पडण्यापेक्षा आता निर्णय करूनच बाहेर पडायचे अशी भूमिका घेत त्यांनी ठिय्या आंदोलन आरंभले. तथापि त्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी रात्री दीड वाजेपर्यंत प्रयत्न सुरू होते. माजी मंत्री प्रकाश आवाडे, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, सागर चाळके यांनी त्यांना ठिय्या आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले. मात्र निर्णय होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार हाळवणकर यांचे उपोषण सुरू झाल्याचे समजल्यावर मंगळवारी दिवसभर प्रांत कार्यालयात यंत्रमागधारकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, कामगारांच्या मजुरीवाढी प्रश्नी निर्णय घेण्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणारी ही पाचवी बैठक आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारी यंत्रमाग कामगार संघटना संयुक्त कृती समितीची थोरात चौकात सभा झाली. दोन पाऊले मागे जाणे म्हणजे पराभव नाही. लांब उडी घेण्यासाठी दोन पाऊले मागे येण्याचे गरजेचे आहे. कामगारांना मिळालेल्या मजुरीवाढीमुळे जे पदरात पडले ते पचवायची तयारी करू या, असे भावनात्मक आवाहन करीत कामगार नेत्यांनी कामगारांची सकारात्मक मानसिकता तयार केली. सोमवारी यंत्रमागधारकांच्या मोर्चावेळी पातळी सोडून केलेल्या टीकेला कामगार नेते मिश्रीलाल जाजू, दत्ता माने, शामराव कुलकर्णी,भरमा कांबळे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवानंद पाटील होते. बोनसबाबत मालक-कामगारांनी निर्णय घ्यायचा बाकी राहिला आहे. यामध्ये कामगारांचा विश्वासघात होणार नाही, अशी ग्वाही कामगार नेत्यांनी दिली.

Story img Loader