जुन्या नांदेड शहरातील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा. नवीन तांत्रिक कत्तलखान्याला दिलेली परवानगी रद्द करावी, यासाठी शिवसेनेच्या पुढाकारातून निघालेल्या मोर्चाने नांदेड सोमवारी दणाणून गेले. मोर्चात तब्बल १०-१५ हजारांचा समुदाय सहभागी झाला होता.
जुन्या नांदेड शहरात असलेला कत्तलखाना हटवावा, अशी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. मात्र, कत्तलखाना हटविण्यास महापालिकेने कोणतेही पाऊल उचलले नाही. दुसरीकडे याच परिसरात नवीन यांत्रिक कत्तलखान्याला परवानगी दिली. परंतु त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, तसेच मोठय़ा प्रमाणात पशुहत्या होणार होत्या. शिवसेनेचा पूर्वीपासूनच या कत्तलखान्याला विरोध होता. कत्तलखान्यात काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींची भागीदारी असल्याने महापालिका प्रशासनही परवानगी रद्द करण्याच्या मागणीबाबत टोलवाटोलवी करीत होते, असा सेनेचा आरोप आहे.
शिवसेनेने हा विषय उचलून धरताच विविध संघटनांनी त्यास पाठिंबा दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, हेमंत पाटील, विश्व िहदू परिषदेचे नवीनभाई ठक्कर, भाजपचे चतन्य देशमुख, प्रवीण जेठेवाड यांच्या पुढाकाराने पशुहत्याविरोधी नागरी कृती समिती तयार करण्यात आली. समितीच्या माध्यमातून मोर्चाचे आयोजन केले होते. ब्राह्मण महासंघटना, संभाजी ब्रिगेडसह विविध २१ संघटनांनी पाठिंबा देऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. जुना मोंढा, महावीर चौक, शिवाजी पुतळा माग्रे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात महिला, युवती व शाळकरी मुलांची संख्या लक्षणीय होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी वक्त्यांनी भाषणात जुना कत्तलखाना शहराबाहेर न्यावा, नव्या कारखान्याची परवानगी रद्द करावी, अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मोर्चादरम्यान सहायक पोलीस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपअधीक्षक, ५ निरीक्षक, ६ फौजदार व १०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तनात होता. मोर्चा अभूतपूर्व झाल्याने कत्तलखान्याला परवानगी मिळावी, यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना सणसणीत चपराक बसली.