कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सिद्धिविनायक केमिकल्स, इंडोकाऊंट, रेमंड, कोंडुसकर, ओसवाल टेक्स्टाइल्स आदी उद्योगांमुळे पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित होत आहेत. यामुळे हे उद्योग बंद करावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने मंगळवारी प्रदूषण नियंत्रण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी सु. स. डोके यांना घेराव घालण्यात आला. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण कार्यालय प्रदूषणप्रश्नी हलगर्जीपणा करीत असल्याने शिवसैनिकांनी डोके यांना धारेवर धरले. अखेर डोके यांनी २७ जून रोजी औद्योगिक वसाहतीस भेट देण्याचे तसेच प्रदूषण करीत असल्याने कारखाने बंद करण्याचे आश्वासन दिले.    
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कारखाने आहेत. बऱ्याच उद्योगांचे सीईटीपी प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे उद्योगांचे रासायनिक सांडपाणी इंगळी गावाशेजारी असलेल्या ओढय़ाद्वारे पंचगंगा नदीमध्ये मिसळत असते. नदीचे पाणी दूषित होऊन गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ यांसारख्या रोगांनी ग्रामीण भागातील लोकांना पछाडलेले आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने १०जून रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी १४ जूनपर्यंत उद्योगांची पाहणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.     
तथापि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कसलीच कारवाई न झाल्याने मंगळवारी शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, महिला आघाडी अध्यक्ष मंगल चव्हाण, जि. प. सदस्य सुमन मिणचेकर, युवासेना अधिकारी गणेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयासमोर निदर्शने केली. डोके यांची भेट घेऊन औद्योगिक पाणी प्रदूषणामुळे होत असलेल्या समस्यांबाबत जोरदार तक्रारी केल्या. प्रदूषणामुळे पाणी किती दूषित झाले आहे, याचा दाखला देण्यासाठी नदीतील हिरवट दरुगधीयुक्त पाण्याची बाटली तसेच पाण्यामुळे रंग बदललेली घागर डोके यांच्यासमोर ठेवण्यात आली. या पाण्याचा वास घेऊन डोके यांनीही नाराजी व्यक्त केली.
 

Story img Loader