गतहंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्य़ातील पाच साखर कारखान्यांवर रॅली काढण्यात आली होती. महिनाअखेरपर्यंत दुसरा हप्ता न मिळाल्यास सप्टेंबर महिन्यामध्ये साखर कारखान्यातील साखर व उपपदार्थ बाहेर पडू दिले जाणार नाहीत, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील यांनी दिला.     
गेल्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला रास्त दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. तेव्हा उसाला २ हजार ५०० रुपयांची पहिली उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला. हंगाम संपून चार महिने लोटले तरी अद्याप शेतकऱ्यांना दुसरा हप्ता मिळालेला नाही. तो टनाला २०० रुपये मिळावा यासाठी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.    या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून गेल्या आठवडय़ात हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील पाच कारखान्यांवर संघटनेने रॅली काढली होती. शनिवारी दुसऱ्या टप्प्यात भोगावती, बिद्री, हमिदवाडा, तांबाळे व कागल येथील साखर कारखान्यांवर रॅली काढण्यात आली. प्रत्येक कारखान्यांवर स्वतंत्ररीत्या दुचाकी रॅली काढण्यात आली. त्याचे नेतृत्व प्रा.जालिंदर पाटील, वासुदेव पाटील, पं.स.उपसभापती अजित पवार, प्रा.सर्जेराव पाटील, बाजीराव देसाई, नितीन देसाई, बाळासाहेब पाटील आदींनी केले. बिद्री कारखान्यावर रॅली आली असता आमदार के.पी.पाटील यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन आठवडय़ाभरात मागणीबाबत निर्णय घेण्यात येईल,असे आश्वासन दिले.