बोरिवली स्थानकाबाहेरील मुंबई महानगरपालिकेच्या जीर्ण इमारतीत वसलेले ‘मुंबई मराठी गं्रथसंग्रहालय आणि वाचनालय’ चंदावरकर मार्गावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या पालिकेच्या इमारतीत हलविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
पालिकेच्या आर/मध्य विभागाच्या रेल्वे स्थानकासमोरील प्रशासकीय इमारतीत गेली अनेक वर्षे हे ग्रंथालय आहे. मात्र, ही इमारत जुनी व जीर्ण झाल्याने पालिकेने आपल्या आर/मध्य विभागाची कार्यालये चंदावरकर मार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत हलविली. मात्र, या नव्या इमारतीत जागा देण्यात न आल्याने ग्रंथालय येथेच आहे. ही इमारत धोकादायक असून त्याला सर्वत्र टेकू लावण्यात आले आहेत. तरीही पालिकेने हे ग्रंथालय येऊन हलविलेले नाही. ‘लोकसत्ता’ने ३० जूनच्या ‘मुंबई वृत्तांत’मध्ये ‘बोरिवलीतील ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ पडझडीच्या छायेत’ या मथळ्याखाली या ग्रंथालयाच्या दुरवस्थेविषयी वृत्त दिले होते. त्याची दखल घेत ‘मनसे’चे उपाध्यक्ष नयन कदम यांनी आर/मध्य विभागाच्या साहाय्यक पालिका आयुक्तांची भेट घेत हे ग्रंथालय नव्या इमारतीत हलविण्याची मागणी केली. तसेच, नव्या इमारतीत जागा देणे शक्य नसल्यास ग्रंथालयाला अन्यत्र पर्यायी जागा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या गं्रथालयात अनेक ग्रंथप्रेमी येतात. ग्रंथालयात तब्बल ६१ हजार पुस्तके असून अडीच हजारांहून अधिक सदस्य ग्रंथालयाचे वाचक आहेत. यात अपंग आणि वृद्धांचाही समावेश आहे. या धोकादायक इमारतीमुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय येथील ग्रंथही नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, हे ग्रंथालय नव्या इमारतीत तातडीने हलविण्यात यावे, अशी या प्रश्नावर मनसेची भूमिका स्पष्ट करताना कदम यांनी सांगितले. अन्यथा मराठी वाचन संस्कृतीची परंपरा गेली ११७ वर्षे सांभाळणाऱ्या या ग्रंथालयाच्या अस्तित्वासाठी आम्हाला आंदोलन पुकारावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.