पोलीस ठाण्यात एखादी तक्रार देताना सर्वसामान्य नागरिकांवर कोणताही दबाव असू नये, यासाठी पोषक वातावरण तयार करण्याची भाषा करणारे ठाण्याचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्यापुढे प्रदीप इंदुलकर यांना झालेल्या मारहाणीमुळे मोठे आव्हान उभे राहिले असून ठाण्यासोबत मुंबई, नवी मुंबईतील सामाजिक वर्तुळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी दबाव वाढू लागला आहे. इंदुलकरांसारख्या कार्यकर्त्यांला पोलीस ठाण्यात मारहाण होत असताना ठाण्यातील एका पोटनिवडणुकीत गुंडांच्या दहशतीने टोक गाठले होते. एरवीसुद्धा सोनसाखळी चोर, घरफोडय़ा करणारे आरोपी यांच्या मुसक्या आवळणे रघुवंशी यांच्या पोलिसांना प्रभावीपणे जमलेले नाही. या पाश्र्वभूमीवर इंदुलकर यांना झालेल्या मारहाणीविरोधात जिल्ह्य़ातील कार्यकर्ते एकवटू लागल्यामुळे चौकशी अहवालाकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
दहीहंडी उत्सवात डीजेचा दणदणाट करणाऱ्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात गेलेले इंदुलकर यांना तेथील पोलीस निरीक्षक (गुन्हे) आर. एस. शिरतोडे यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त रघुवंशी यांनी उपायुक्त अशोक दुधे यांच्यामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. एरवी लहान-सहान प्रश्नावर ‘शायिनग’ करत भाषणे झोडणारे ठाण्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी इंदुलकर यांना झालेल्या मारहाणीविषयी मौन धारण केले आहे. दहीहंडीसारख्या उत्सवात ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसविले जात असताना असे उत्सव साजरे करणाऱ्या राजकीय नेत्यांना खाकी वर्दीतील गुंडगिरीचा राजाश्रय लाभल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमी इंदुलकर यांना पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण झाल्याने खुद्द पोलीस आयुक्तांची कार्यपद्धती वादात सापडली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच रघुवंशी यांनी पोलीस, नागरिक यांच्यातील संवाद वाढावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली होती. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही रघुवंशी यांना अपेक्षित होते. इंदुलकर यांना पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप होत असल्यामुळे रघुवंशी यांच्या घोषणेचे नेमके काय झाले, असा सवाल आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत
इंदुलकरांना झालेल्या मारहाणीच्या निषेध म्हणून मुंबई तसेच ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त दुधे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. ठाण्यातील सामाजिक संस्था तसेच संघटनेचे प्रतिनिधी जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, अॅड ए. डी. पुजारी, अॅड. त्रिंबक कोचेवाड आणि उन्मेश बागवे आदींनी सोमवारी पुन्हा पोलीस उपायुक्त दुधे यांची भेट घेऊन कारवाईसंबंधी विचारणा केली. मात्र, चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसून ती येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल, असे दुधे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी प्रतिनिधींनी यावेळी केली. तसेच या चौकशीच्या प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पूर्ण करावी. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रतिनिधींनी दिला. दरम्यान, यासंबंधी चौकशी सुरू असून लवकरच अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी पत्रकारांना दिली. पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविताना नागरिकांवर कोणताही दबाव आहे असे आम्हाला वाटत नाही, असेही दुधे यांनी स्पष्ट केले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा