आगरी समाजातील वाढदिवस, बारसे, पाचवी, विवाह सोहळे, अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमांमध्ये बेसुमार उधळपट्टी केली जाते. धनदांडग्या नागरिकांना हा खर्च पेलवत असला तरी सामान्य नागरिक यामध्ये होरपळून जातो. समाजात त्यांची नाहक कुचंबणा होते. समाजाच्या सर्व स्तरांत एकजीनसीपणा राहावा, या खर्चावर बंधन घालणारी एक आदर्श आचारसंहिता तयार करावी, या उद्देशातून वारकरी सांप्रदायिक समाजोन्नत्ती महासंघातर्फे शनिवार, ३० मार्च रोजी डोंबिवलीत एका बैठकीचे आयोजन केले आहे.
सागाव येथील पिंपळेश्वर मंदिरात दुपारी चार वाजता होणाऱ्या या बैठकीला समाजातील कीर्तनकार, जाणकार नागरिक, काही संस्थांचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या वेळी ‘आगरी समाजातर्फे करण्यात येणाऱ्या समारंभातील वारेमाप खर्च’ विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
आपल्या जुन्या प्रथा-परंपरांप्रमाणे बारसे, वाढदिवस, साखरपुडा, हळदी, विवाह सोहळा तसेच अंत्येष्टीचे कार्यक्रम केले नाही तर पुढील पिढीला त्याचा त्रास होईल, कुटुंबावर देवाचा कोप होईल, अशा अंधश्रद्धा बाळगून कार्यक्रम केले जात होते. त्या वेळी महागाईचा काळ नसल्याने कुटुंबीयांना त्याची फारशी झळ बसत नव्हती. आताच्या महागाईच्या काळात या प्रथा पाळणे धनदांडगा वर्ग सोडला तर सामान्य गरीब कुटुंबाला कर्ज घेऊनही करता येत नाही. समाजामध्ये अशा वर्गाची होरपळ होते. घर, बंगला, गाडी नसेल तर सामान्य कुटुंबातील मुलींची लग्ने जुळवताना अडचणी येत आहेत. अंत्येष्टीच्या कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी केली जाते. हा विचार करून आगरी समाजातील समारंभातील खर्च कमी करण्याचा विचार आताच्या नवतरुण मंडळींनी पुढे आणला आहे, असे संयोजक निळजे गावचे शरद पाटील यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून देसाई-पडले गावचे शांताराम भोईर हेही हा खर्च कमी करण्यासाठी मोहीम राबवित आहेत.
कीर्तनकारांनी हा संदेश आपल्या प्रवचनातून आवर्जून द्यावा. गावातील प्रत्येक तरुण कार्यकर्त्यांने यापुढे आपण समारंभात वारेमाप खर्च करणार नाही यासाठी वचनबद्ध झाले पाहिजे. हा संदेश ठाणे, रायगड, वसई भागातील आपल्या नातेवाइकांना दिला पाहिजे. या खर्चावर बंधने आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे शरद पाटील यांनी सांगितले.
आगरी समाज बदलतोय..
आगरी समाजातील वाढदिवस, बारसे, पाचवी, विवाह सोहळे, अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमांमध्ये बेसुमार उधळपट्टी केली जाते. धनदांडग्या नागरिकांना हा खर्च पेलवत असला तरी सामान्य नागरिक यामध्ये होरपळून जातो.
आणखी वाचा
First published on: 29-03-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agri caste society is changing