वाढती महागाई, बाजारात ठाण मांडून बसलेली मंदी आणि एकूणच सभोवताली पसरलेल्या निरुत्साहावर मात करून डोंबिवलीत गेले आठवडाभर मोठय़ा उत्साहात आगरी महोत्सव साजरा झाला. या महोत्सवास वर्षांगणिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद लाभत असून यंदा तपपूर्तीच्या उंबरठय़ावरील अकराव्या महोत्सवास तब्बल पाच लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. केवळ डोंबिवली परिसरच नव्हे तर मुंबई, कर्जत, नाशिक, पेण, उरण आदी परिसरांतील आगरी समाजातील नागरिकांबरोबरच इतर समाजातील लोकही मोठय़ा संख्येने या महोत्सवात सहभागी होऊ लागले आहेत. चारचाकी गाडय़ांपासून मुलांच्या खेळण्यांपर्यंत तर कपडे-दागदागिने ते विविध प्रांतांतील रुचकर खाद्यपदार्थाचे स्टॉल्स हे महोत्सवाचे एक प्रमुख वैशिष्टय़ ठरू लागले असले तरी हा सोहळा आता केवळ तेवढय़ापुरता मर्यादित राहिलेला नाही. खरेदी-विक्रीबरोबरच साहित्य, कला आणि संगीताचे एक सशक्त व्यासपीठ म्हणून डोंबिवलीतील आगरी महोत्सव ओळखला जाऊ लागला आहे. गेली काही वर्षे माध्यम प्रायोजक म्हणून ‘लोकसत्ता’ आगरी महोत्सवाच्या या संक्रमणाचा साक्षीदार ठरला आहे. बुधवारी रात्री हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या महोत्सवाची सांगता झाली.
संध्याकाळी चार ते रात्री दहा दरम्यान भरणारा हा महोत्सव म्हणजे एक अत्यंत सुनियोजित जत्राच होती. आगरी युथ फोरमच्या माध्यमातून भरविण्यात येणाऱ्या या महोत्सवात यंदा झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘राधा ही बावरी’च्या कलावंतांनी भेट दिली. तसेच रवी जाधव दिग्दर्शित आगामी ‘टीपी’ अर्थात ‘टाइमपास’ चित्रपटाच्या कलावंतांनीही महोत्सवात हजेरी लावून रसिकांचे मनोरंजन केले. महोत्सवात मान्यवरांबरोबरच स्थानिक होतकरू कलावतांना कला सादर करण्याची संधी देऊन प्रोत्साहित केले जाते. संयोजन समितीचे अध्यक्ष गुलाब वझे आणि त्यांचे सहकारी पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, रामकृष्ण पाटील, प्रकाश भंडारी, जालिंदर पाटील आदींच्या देखरेखीखाली अतिशय शिस्तबद्धपणे महोत्सव पार पडला.
मंदी आणि महागाईवर मात करून ‘आगरी महोत्सवा’ला उत्साही प्रतिसाद
वाढती महागाई, बाजारात ठाण मांडून बसलेली मंदी आणि एकूणच सभोवताली पसरलेल्या निरुत्साहावर मात करून डोंबिवलीत गेले आठवडाभर मोठय़ा उत्साहात आगरी महोत्सव साजरा झाला.
First published on: 13-12-2013 at 06:54 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agri mahotsav in thane