पारंपरिक शेतीपेक्षा तंत्रज्ञानावर आधारित शेतीच आता अधिक व शाश्वत फायद्याची ठरणारी आहे, असे मत औरंगाबाद येथील हरितगृह व शेडनेट हाऊस उभारणी तंत्रज्ञानाचे सल्लागार मंगेश पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाच्या वतीने हरितगृह व शेडनेट हाऊस उभारणी तंत्रज्ञान चर्चासत्र घेण्यात आले. त्या वेळी पाटील बोलत होते. अॅड. त्र्यंबकदास झंवर, डॉ. तुकाराम मोटे, पटवेकर उपस्थित होते. इस्त्रायलने मातीविरहित शेतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांच्या तुलनेत आपण बरेच मागे आहोत. हरितगृह, शेडनेट हाऊस ही संरक्षित शेती आहे. त्यातील तंत्र लक्षात घेऊन शेतीवर काम करणे गरजेचे आहे. दुसऱ्याने केले म्हणून आपण तसेच करून चालत नाही. त्याचे शास्त्र अवगत करून घ्यायला हवे. बदलत्या वातावरणानुसार शेडनेट निर्मिती आवश्यक आहे. हरितगृह व शेडनेटचा वापर गटशेतीच्या माध्यमातून शेती करण्यासाठी करावा, असे आवाहन अॅड. झंवर यांनी केले.
निसर्गाच्या शेतीपेक्षा तंत्रज्ञानाची शेती अधिक फायदेशीर असल्याचे अॅड. व्यंकट बेद्रे यांनी सांगितले. प्रगतिशील शेतकरी प्रसाद देव, पुण्याचे फूल पीक व भाजीपाला उत्पादक शरद पवार, अग्रणी बँकेचे पटवेकर यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी प्रास्ताविक केले.

Story img Loader