गेली अनेक वर्षे खते आणि बियाण्यांचा सुरू असलेला काळा बाजार आपण रोखू शकलो हीच कृषी विभागाची मोठी उपलब्धी आहे. आता शेतीमालाला योग्य किंमत मिळवून देणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगताना कार्यकर्त्यांनी गटातटाचे राजकारण करण्यापेक्षा विकासासाठी एकत्र येऊन पुढील एक महिन्यात गावाचा कृषी आराखडा तयार करावा असे आवाहन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या कृषी आढावा बैठकीत विखे बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे आदी या वेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, राज्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. खालची धरणे ३० टक्के भरल्याशिवाय वरील भागातील धरणातील पाणी अडवू नये असा २००६ साली मंत्रिमंडळाचा निर्णय झाला होता. आता तर कोणत्याच धरणावर पाऊस नाही. गेल्या दहा, बारा वर्षांत नवीन पाणी निर्माण करण्याचे प्रयत्न झाले नाही. निळवंडेच्या नावावरही निवडणुकीचे राजकारण करून
 समाजाचा बुद्धिभेद करण्यातच सगळ्या पुढा-यांनी वेळ खर्ची घातला. त्यामुळेच पाण्याचा प्रश्न मागे पडला आहे. कोकणातील पाणी गोदावरील खो-यात आणल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी काही सूचना किंवा अडचणी असल्यास राहाता, संगमनेर आणि लोणी येथील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह डॉ.धनंजय धनवटे, भाऊसाहेब कडू, शांतिनाथ आहेर आदींची या वेळी भाषणे झाली. वक्त्यांनी कृषी विभागाच्या योजनांबद्दल समाधान व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा