विहीर अनुदानासाठी शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी कृषी विस्तार अधिकाऱ्यास पकडून त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील शेतकरी बबन ऊर्फ मेसा सोनाजी जाधव यांची अनुसूचित जाती उपयोजनेच्या अंतर्गत विहीर खोदण्यासाठी लाभार्थी म्हणून निवड झाली होती. गेल्या मे महिन्यात कृषी विस्तार अधिकारी वसंत मदन यांनी विहीर खोदकामाची पाहणी करून अनुदान देण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी करून २ हजार रुपये घेऊन जूनमध्ये ६४ हजार १८१ रुपयांचा धनादेश दिल्याचे फिर्यादी जाधव याने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर अनुदानाच्या उर्वरित रकमेसाठी गेल्या १६ जानेवारी रोजी तलाठी मदन याने ४ हजार रुपये मागितले. जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर तलाठी जाधव यास जालना येथील राहत्या घरी संबंधित शेतकऱ्याकडून ४ हजार रुपये स्वीकारताना पथकाने पकडले. पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एच. व्ही. गिरमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader