कृषी शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठा कालावधी लागतो. ही दरी दूर करण्यास केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने कृषीसंशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यास उपक्रम हाती घेतले आहेत. परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत लातूर येथे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी या साठी पुढाकार घेतला आहे.
महिला व ग्रामीण विकासांतर्गत ऊतिसंवर्धनाधारित एकात्मिक जैवतंत्रज्ञान प्रकल्पासाठी केंद्राने १ कोटी ११ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील शास्त्रज्ञांच्या पथकाने संशोधन, प्रशिक्षण व विस्तार या माध्यमातून महिला व ग्रामीण विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवला आहे. प्रकल्पांतर्गत केळी व ऊस पिकांच्या रोपांची निर्मिती ऊतिसंवर्धनाद्वारे केली जाणार आहे. प्रकल्पांतर्गत व्यवसायाभिमुख प्रशिक्षण व जैवतंत्रज्ञानाधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करून शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यात येईल. प्रा. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राहुल चव्हाण व डॉ. अमोल देठे यांनी या साठी मेहनत घेतली. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. केळीच्या व उसाच्या प्रत्येकी दोन जातींचे वाण ऊतिसंवर्धनाद्वारे किफायतशीर किमतीत उपलब्ध केले जाणार आहे. सुशिक्षित बेरोजगार महिला, ग्रामीण युवक व विद्यार्थ्यांना ऊतिसंवर्धन हरितगृह संगोपन व व्यवस्थापन, जैविक खते (उदा. गांडूळ खतनिर्मिती) व पिकांसाठी सुयोग्य वापर या बाबत प्रशिक्षण, ऊस व केळी पिकांची रोपनिर्मिती, लातूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर ऊतिसंवर्धित ऊस व केळी पिकांसाठी जैविक व गांडूळ खते वापरातील फायदे या साठी प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांशी संवाद या बाबतची प्रक्रिया विद्यापीठ पातळीवर सुरू आहे.
महिलांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्या रोपांचे संगोपन स्वत: करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर त्याची लावण कशी करायची व त्याचे संगोपन कसे करायचे? याचे मार्गदर्शन महिलाच देऊ शकतील. पिकांची उत्पादकता यातून वाढेलच, शिवाय महिलांचे सक्षमीकरणही होणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या बांधावर शेतीसंशोधन
कृषी शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठा कालावधी लागतो. ही दरी दूर करण्यास केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने कृषीसंशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यास उपक्रम हाती घेतले आहेत.
First published on: 21-06-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture research on farmers bund