जीवनातील एका विशिष्ट टप्प्यावर ते दोघे एकत्र आले. कुटुंबियांच्या संमतीने विवाह बंधनात अडकले. यानंतर पुढचे पाऊल म्हणजे त्यांनी संसाराच्या वेलीवर गोजिरवाण्या बाळाचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न प्रत्यक्षात येत असतानाच ‘ती’ मात्र जग सोडून गेली.. चार चौघांची वाटणारी ही गोष्ट एड्सबाधित रमेश आणि सीमा (नाव बदलले आहे) या दांपत्याची. दुर्धर आजार तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. पण, जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान झालेली हेळसांड दुर्लक्षिता न येणारी.
दोन भिन्न संस्कृतीत वाढलेले रमेश आणि सीमा आपले जीवनसाथी दुरावल्याने एकाकी आयुष्य जगत होते. एकिकडे एकटे असल्याची भावना आणि दुसरीकडे जीवनसाथीमुळे एड्स सारखा झालेला दुर्धर आजार यामुळे दोघांचे आयुष्य कुठेतरी खुंटल्यासारखे झालेले. मात्र, येथील एका सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आयोजित वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. ती गुजराथी तर तो जैन संस्कृतीत लहानाचा मोठा झालेला. खाद्य, वेश अन् संस्कृती भिन्न असूनही दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयावर कुटूंबियांनी होकाराने पसंतीची मोहोर उमटविली. दोन वर्षांपूर्वी ते पुन्हा एकदा नव्याने विवाह बंधनात अडकले. लग्नाच्या पहिल्या वर्षांनंतर दोघांनी हव्या असलेल्या आगंतुक अशा गोजिरवाण्याची प्रतीक्षा करण्यास सुरूवात केली. आपल्याला असणारा आजार पाहता, आपण असलो किंवा नसलो तरी आपल्या प्रेमाची एक सुंदर आठवण या जगात ठेवायची या हेतुने त्यांनी धडपड सुरू केली. एचआयव्ही बाधितांना अपत्यसुखाचा आनंद घेता येतो याची माहिती त्यांना होती. त्या अनुषंगाने आवश्यक असणारे वैद्यकीय उपचार, आहार, विहार या त्रिसुत्रीचा आधार घेत तिने गर्भिणीसाठीची नऊ महिन्यांची ऋतुचर्या पूर्ण केली.
जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात प्रसुती कळा सुरू झाल्यावर रमेशने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्या ठिकाणी ती एचआयव्ही बाधित असल्याचे कळताच संबंधित डॉक्टरांनी उपचार करण्यास असमर्थता दर्शवत दांपत्यास शासकीय रुग्णालयाचा रस्ता दाखविला. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला होणारा त्रास पाहता शस्त्रक्रियेद्वारे बाळंतपणाचा निर्णय घेतला. तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. सगळीकडे आनंदी आनंद असताना तिच्या आजाराने जोर धरला. तिला रात्रीच फिट येण्यास सुरूवात झाली. अतिरक्तस्त्रावाने तिला अशक्तपणा आलाच होता. या कालावधीत डॉक्टरांकडून जसे संपूर्ण सहकार्य मिळाले तसे रुग्णालयातील परिचारिकांकडून मिळाले नाही. परिचारीकांना तिच्या आजाराविषयी कळले, तेव्हापासून त्यांनी तिच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यास सुरूवात केली. अतिदक्षता विभागात तिची रवानगी करतानाही परिचारीका आणि वॉर्डबॉयने रमेशला अतिशय तुच्छतेची वागणूक दिली. यामुळे त्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातला असता डॉक्टरांनी संबंधितांची कानउघाडणी केली. अतिदक्षता विभागातही त्याच घटनांची पुनरावृत्ती झाली. या ठिकाणी सीमाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. ऑक्सिजन संपल्यावर सिलिंडर बदलण्यात आले नाही. रमेशने तीन ते चार वेळा तक्रार केल्यावर सिलिंडर लावण्यात आले. सायंकाळी पुन्हा तोच प्रकार. दुसरीकडे बाळाचीही प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याने दोन्ही ठिकाणी धावपळ करण्यात रमेशची सायंकाळ झाली. त्याच्या जीवनात खरेतर नव्याने आलेले बाळ आणि सीमा हे दोघेही तितकेच महत्वाचे होते. पण नियतीला ते मान्य नसावे. शनिवारी रात्री सीमाने अखेरचा श्वास घेतला आणि या दांपत्याने पाहिलेल्या स्वप्नातील एक कडी निखळली..

Story img Loader