श्रेष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘नटसम्राट’ या प्रसिद्ध नाटकातील घराबाहेर काढण्यात आलेल्या माता-पित्यांची समस्या येथील जिल्हाधिकारी ओम प्रकाश बकारिया यांनी आपल्या दालनात अनुभवली. त्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे निमित्त ठरले.
वाघोदा शिवारातील वीरभाई कोतवाल नगरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच मुलाकडून होत असलेल्या छळाची कहाणी जिल्हाधिकाऱ्यांना ऐकवली तेव्हा उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती, सहाय्यक जिल्हाधिकारी सुमन रावत, निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी या सर्वाची मने हेलावली.
३६ वर्षांच्या मुलाने आईच्या नावावर असलेला प्लॉट ताब्यात घेतला आहे. आई-वडील दोघांनाही मारझोड करून त्याने घरातून हाकलून दिले. त्यामुळे मोठय़ा मुलाकडे भाडय़ाच्या घरात ते दोघे राहत आहेत. तेथेही लहान मुलगा येऊन धिंगाणा घालत असतो आणि तीन हजार रुपयांची मागणी करतो. त्याविरुद्ध पोलिसात तक्रारही केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याला समज दिली. तात्पुरती त्रासातून मुक्तता झाली. परंतु आता पुन्हा त्याने छळ सुरू केला आहे. त्यामुळे ‘साहेब, मला आणि माझ्या नवऱ्याला मुलाच्या छळातून मुक्त करा’ असे आर्जव ती करीत होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्या मुलास तत्काळ त्याने केलेल्या कृत्याबद्दल खुलासा करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित करण्याची सूचना केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आधाराने ती महिला भारावून गेली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा