भारतीय वायुसेनाप्रमुख एअर चिफ मार्शल अरुप राहा यांचे उद्या बुधवारी नागपुरात आगमन होणार आहे. त्यांच्या पत्नी लिली राहा यादेखील त्यांच्यासोबत येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमांडचे वरिष्ठ वायू व प्रशासन अधिकारी तसेच वायुसेना स्थानकाचे प्रमुख एअर व्हाईस मार्शल सागर भारती व स्थानिक ‘आफवा’ अध्यक्षा व त्यानंतर अनुरक्षण मुख्यालयाच्या धावपट्टीवर अनुरक्षण कमांडचे वायु अधिकारी कमांडिंग इन चिफ एअर मार्शल पी. कनकराज व त्यांच्या पत्नी क्षेत्रीय ‘आफवा’ अध्यक्षा उषा कनकराज वायुसेनाप्रमुखांचे स्वागत करतील.
भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमांडरांचे संमेलन ४ ते ६ मार्च दरम्यान नागपुरात होत असून त्यासाठी वायुसेना प्रमुख नागपुरात येत आहेत. उत्कृष्ट काम करणाऱ्या युनिट््सला ते पारितोषिके प्रदान करतील. यादरम्यान, ‘आफवा’च्या (एअरफोर्स व्हावीज वेलफेअर असोसिएशन) क्षेत्रीय मंडळाची वार्षिक बैठक होत असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ‘आफवा’च्या अध्यक्षा लिली राहा राहतील. उषा कनकराज यांच्यासह देशभरातील विविध युनिट्सच्या ‘आफवा’ अध्यक्षा या बैठकीत उपस्थित राहतील. या सर्व युनिट्समधील ‘आफवा’च्या कामांची प्रगती तसेच कल्याणकारी योजनांचा त्या आढावा घेतील.