भारतीय वायुदलाच्या नागपुरातील अनुरक्षण कमांड मुख्यालयाचे वायु ऑफिसर इन चीफ म्हणून एअर मार्शल पी. कनकराज यांनी आज सूत्रे स्वीकारली. एअर मार्शल पी. कनकराज यांनी त्रिचीच्या रिजनल इंजिनिअरिंग महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर मद्रासमधून आयआयटी केले. त्यांना भारतीय वायुदलाच्या एअरोनॉटिकल इंजिनिअर शाखेत २५ जुलै १९७७ रोजी कमिशन मिळाले. नागपूरला रूजू होण्यापूर्वी ते वायुदल मुख्यालयात एअर ऑफिसर इंचार्ज मेन्टेनन्स या पदावर काम पाहत होते. त्यांनी वायुदलाच्या नोकरीच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी महासंचालक (एअरक्राफ्ट) आणि महासंचालक (सिस्टिम्स) या जबाबदारीच्या पदांवर वायुदल मुख्यालयात काम केले आहे. वेस्टर्न एअर कमांडमध्ये ते सिनियर मेन्टेनन्स स्टाफ ऑफिसर, एअर फोर्स एअर फोर्स टेक्निकल कॉलेज, प्रधान संचालक वायुदल मुख्यालय, कमांडिंग ऑफिसर एअर आर्ममेंट इन्स्पेक्शन विंग (खमारिया) आणि जोधपूर एअर स्टेशनचे मुख्य इंजिनिअरिंग ऑफिसर या पदांवरही ते कार्यरत होते.
वायुदलातील अतुलनीय सेवेसाठी एअर मार्शल कनकराज यांना २००९ साली विशिष्ट सेवा पदक आणि २०१२ साली अतिविशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले. ते स्वत: उत्तम गोल्फर असून जिम्नॅशियममध्ये जाण्याची त्यांना आवड आहे. त्यांच्या पत्नी उषा कनकराज वायुदल सैनिकांच्या कुटुंबासाठी असलेल्या एअर फोर्स वाईव्ज असोसिएशन आणि महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या असलेल्या प्रकल्पांमध्ये सातत्याने सहभागी होत राहिलेल्या आहेत. विकलांग मुलांसाठी चांगले शिक्षण मिळावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air marshal kanakaraj major of maintenance command