ठाणे शहरात हवेच्या प्रदूषणाने आता टोक गाठले असून मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे शहरातील प्रमुख चौकांमधील वायू प्रदूषण आता धोक्याची पातळी गाठण्याच्या बेतात आहे. ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार शहरातील प्रमुख चौकांमध्ये कार्बन मोनॉक्साईड, बेन्झीन तसेच जड धातूंच्या प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. चौक म्हटले की वायू प्रदूषणाची पातळी वाढते हा सर्वसामान्य नियम लक्षात घेतला तरीही ठाणे शहरातील गेल्या काही वर्षांत या पातळीचा आलेख सातत्याने चढता असल्यामुळे हे प्रदूषण रोखण्याचे मोठे आव्हान येत्या वर्षांत वाहतूक पोलीस तसेच प्रदूषण नियंत्रण विभागाला पेलावे लागणार आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर होणाऱ्या प्रदूषणाचा गेल्या वर्षभरात सखोल अभ्यास करून या संबंधीचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंदनगर, कॅसल मिल, मुलुंड चेक नाका, बाळकुम नाका, नितीन कंपनी, गावदेवी मैदान अशा प्रमुख नाक्यांवरील वायू प्रदूषणाच्या पातळीची या वेळी तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान या सगळ्या चौकात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत प्रदूषणाची पातळी वाढली असून आनंदनगर चौकातील पातळी तर मानवासाठी धोकादायक ठरू शकते, असा निष्कर्ष या अहवालात नोंदविण्यात आला आहे. कार्बन मोनॉक्साइड, बेन्झीन तसेच जड धातूंचे हवेतील प्रमाण वाढल्यास श्वसनाचे तसेच चेतासंस्थेचे विकार होऊ शकतात. वायू सर्वेक्षण  दरम्यान चौकातील जड धातूंचे प्रमाण काही प्रमाणात आटोक्यात असले तरी आनंदनगर चौकात हवेतील शिसांचे प्रमाणही मर्यादेबाहेर पोहोचल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. कॅडबरी जंक्शन, माजीवडा नाका, कापुरबावडी नाका, कॅसलमिल नाका, कळवा नाका, तीन हात नाका या प्रमुख चौकांमध्ये कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असून या भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी त्यास कारणीभूत असल्याचे मत अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
या सगळ्या चौकांमध्ये ज्याप्रमाणे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे तसेच धूळ आणि धुराचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील विटावा पुलाचा अपवाद वगळता शहरातील सर्व प्रमुख चौकांमधील धुळीचे कण वाढले आहेत. आनंदनगर चौकात खूप रहदारी असल्यामुळे धुळीचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असून बाळकुम नाका परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे धुळीच्या प्रमाणात काही अंशाने घट झाली आहे. महामार्गावरील प्रदूषणाच्या पातळीत एकीकडे वाढ होत असताना गोखले मार्गावरील शाहू मार्केट परिसर हा सर्वात प्रदूषित चौक बनल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. गोखले मार्गावरून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या बरीच मोठी आहे. वेगवेगळे प्रयत्न करूनही  गोखले मार्गावरील चौकातील वाहतुकीचा घोळ कमी करणे वाहतूक पोलिसांना अद्याप जमलेला नाही. त्यामुळे शाहू मार्केटचा परिसर सर्वाधिक प्रदूषित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोपरी चौकातही धुळीकणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौकांतील प्रदूषण वाढले, रस्ते धुळीने माखले
वायू प्रदूषणाच्या पातळी मोजण्यासाठी ठाणे महापालिकेने केलेल्या या सर्वेक्षणात शहरातील अंतर्गत भागातही धुळीच्या प्रदूषणाचे प्रमाण बरेच मोठे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गोखले मार्ग, कोपरी चौक यांसारख्या परिसरात तर हे प्रमाण श्वसनक्रियेसाठी हानीकारक ठरू लागले आहे. ठाणे शहराच्या पश्चिमेकडे असलेला वर्तकनगर चौक, सावरकरनगर चौक परिसरातही धुलीकणांचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत पोहोचले आहे. हॉटेल, बेकरी तसेच रस्त्यालगत उभी राहणाऱ्या बांधकामांमुळे हे प्रमाण आणखी वाढू लागले आहे. त्यामुळे धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धूळ मुक्त रस्त्यांसाठी काही उपाय आखण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. बांधकाम केल्यानंतर कंत्राटदारांनी रस्ते पाण्याने धुवावेत, असा फतवा महापालिका काढणार असून हा नियम मोडणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद नव्याने करण्यात येणार आहे. रस्त्यांची तसेच पदपथांची कामे झाल्यावर बांधकाम साहित्य अर्धवट टाकून रस्त्यांवर धुळवड निर्माण करणाऱ्या ठेकेदारांना आवर घालण्याची गरज या अहवालात व्यक्त  करण्यात आली आहे.