ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य वीज महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठवलेली वीज बिले झटके देणारी असून ऐरोली विभागात अशा प्रकारची दीड हजार ग्राहकांना वीज बिले देण्यात आली असल्याचे समजते. ही वाढीव बिले १५ दिवसांत न भरल्यास वीज कापण्याचे पत्रही या बिलाच्या मागोमाग धाडण्यात आले आहे. नवी मुंबई हे वीज बिल भरण्यात वरच्या क्रमांकावर असल्याने वीज वितरण कंपनीने ही ‘वसुली’ सुरू केल्याची चर्चा आहे. राज्य आणि केंद्र सरकार एकीकडे ‘जागो ग्राहक जागो’ सारखे अभियान चालवत असताना सरकारच्याच कंपनीने सुरू केलेल्या या लुटीची दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
राज्य सरकारच्या वीज अपीलीय लवादाने ७३४ कोटी रुपये तूट वसुलीसाठी महावितरण कंपनीला ऑक्टोबरपासून सहा महिने दरवाढीची संमती दिली आहे. त्यामुळे वीज ग्राहकाला प्रति युनिट २० पैसे अतिरिक्त वीज बिल येणार आहे. महिन्याला ३०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकाला ६० रुपये जादा बिल भरावे लागणार आहे. याच संधीचा फायदा उठवून महावितरण कंपनीने बिल भरण्यात अव्वल असणाऱ्या शहरातून वसुली मोहीम राबविल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही दरवाढ काही ग्राहकांच्या डोक्यावर आत्तापासून मारण्यात आली आहे. नवी मुंबईतील ग्राहक वीज बिल भरण्यात अग्रेसर आहेत. त्यामुळेच येथील ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली जात आहेत. ऐरोली येथील साईनाथ वाडीत ( हा भाग बैठय़ा घरांचा आहे) राहणारे एक रहिवाशी एन.टी गायकवाड यांना त्यांच्या छोटय़ाशा घराचे बिल ३७ हजार ७०० रुपये आले होते. त्यांना तर हे बिल बघून धक्काच बसला. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात जाऊन यासंदर्भात जाब विचारला. काही कारखान्यांचेही इतके बिल येत नाही तर एका साध्या घरात राहणाऱ्या रहिवाशाला इतके बिल कसे देता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तेव्हा त्यांचे बिल कमी करून ४ हजार ७०० रुपये देण्यात आले. हे बिलही जादा असल्याची तक्रार त्यांनी केली, पण ते बिल भरण्याचा आग्रह करण्यात आला. त्यापूर्वी दोन कर्मचारी त्यांचे वीज जोडणी तोडण्यास गेले होते. यापूर्वी त्यांना एक हजाराच्या वर बिल येत नव्हते. तेव्हा तो मीटर नादुरुस्त असल्याचा दावा वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला. नादुरुस्त मीटरचे गेली नऊ वर्षे बिल वितरण कंपनी देत होती आणि आता अचानक ते मीटर नादुरुस्त असल्याचा साक्षात्कार कंपनीला झाला. हे एक प्रातिनिधिक स्वरूपाचे उदाहरण असून अशा अनेक तक्रारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दररोज येत आहेत. कंळबोली येथे रिपाइंने या दरवाढीच्या विरोधात मोर्चा नेला होता पण थातुरमातुर उत्तरे देऊन वितरण कंपनीचे अधिकारी या शिष्टमंडळांना वाटेला लावत असल्याचे दिसून येते. प्रामाणिक बिल भरणारे शहर म्हणून नवी मुंबईतील ग्राहकांना वीज वितरण कंपनी अशा प्रकारे फसवत असल्याचे आढळून आले आहे. या फसवणुकीची दाद कुठे मागायची असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
ऐरोलीकरांना वाढीव वीज बिलांचा धक्का..!
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य वीज महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठवलेली वीज बिले झटके देणारी असून ऐरोली विभागात अशा प्रकारची दीड हजार ग्राहकांना वीज बिले देण्यात आली असल्याचे समजते.
First published on: 07-09-2013 at 12:48 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airoli people get increase electricity bill