मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात असून बास्केटबॉल हा खेळ, त्यातले खेळाडू, प्रशिक्षक आणि त्या अनुषंगाने नात्याविषयी सांगू पाहणारा ‘अजिंक्य’ हा चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. ते स्वत: बास्केटबॉल खेळलेले असल्यामुळे हा खेळ आणि त्या अनुषंगाने पती-पत्नी नाते आणि एकूणच जिंकणे म्हणजे सर्व काही नसते या पद्धतीचे भाष्य करण्याचा प्रयत्न ‘अजिंक्य’द्वारे आपण केला आहे, असे देऊस्कर यांनी सांगितले. कोणत्याही खेळामध्ये जिंकणे म्हणजे नक्की काय, खेळ म्हणजे नेहमीच जिंकायला हवे असे नसते हे सांगण्याचा प्रयत्न ‘अजिंक्य’द्वारे आपण केलाय, असे देऊस्कर म्हणाले. संदीप कुलकर्णी यांनी अनंत ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. बास्केटबॉल संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करीत असलो तरी हा चित्रपट तुमच्या आयुष्यात किंवा खेळात तुम्हाला जिंकायचे आहे या पलीकडे जाणारा आहे, असे कुलकर्णी म्हणाले. पती-पत्नी, मित्र यांच्या नातेसंबंधांबद्दल चित्रपट बोलतो. बास्केटबॉलच्या सामन्यात शेवटच्या दोन-तीन मिनिटांपर्यंत काय होणार ते सांगता येत नाही. त्या अनुषंगाने आयुष्याचा संदर्भ घेतला तर नातेसंबंध ही अतिशय नाजूक बाब असते. त्यामुळे ते जपण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, त्याबद्दलचा हा चित्रपट आहे, असेहीही त्यांनी सांगितले.  
अभिनेत्री कादंबरी कदम हिने अनंत म्हणजे संदीप कुलकर्णीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांचा समतोल राखत जगणे ही तारेवरची कसरत ती करतेय, या भूमिकेद्वारे आजची करिअरिस्ट स्त्री साकारण्याची संधी या चित्रपटामुळे मिळाली, असेही कादंबरी कदम हिने नमूद केले. या चित्रपटाच्या ‘फर्स्ट लूक’बरोबरच संकेतस्थळाचे उद्घाटन ‘डोंबिवली फास्ट’, ‘मुंबई मेरी जान’फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या हस्ते करण्यात आले.

Story img Loader