जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने घोषित केलेले अजिंठा व वेरुळ येथील अभ्यागत केंद्र पर्यटकांसाठी १६ सप्टेंबरपासून खुले होत आहे. या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. के. चिरंजिवी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील. पर्यटनमंत्री छगन भुजबळ व पर्यटन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बौद्ध, जैन व हिंदू धर्माच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या लेण्यांकडे मोठय़ा प्रमाणात विदेशी पर्यटक आकर्षित होत आहेत. प्राचीन शिल्पांचे जतन व संवर्धन करणे हा या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांचा विकास करून वाढत्या पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविण्यात याव्यात. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे कामकाज १९९२ ते २००२ मध्ये झाले. त्याचा खर्च १२७ कोटी रुपये आला असून त्यात १८० किलोमीटर रस्ता, एअर स्ट्रीप, पर्यटक सुविधा केंद्र, व्ह्य़ू पॉइंट, अजिंठा गार्डन या बरोबरच पाणी व वीज सुविधा आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम २००४ ते २०१३ दरम्यान करण्यात आले. या साठी २१५ कोटी खर्च झाला असून, यात प्राचीन लेण्यांचे जतन, पर्यटकांसाठी सुविधा व अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली. प्राचीन लेण्यांची हुबेहूब प्रतिमा हे या प्रकल्पाचे महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्याकडून यासाठी प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, या केंद्राच्या उद्घाटनानिमित्त करावयाचे विविध प्रयत्न व नियोजनाबाबत जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते.
अजिंठा-वेरुळ अभ्यागत केंद्र पर्यटकांसाठी १६पासून खुले
जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने घोषित केलेले अजिंठा व वेरुळ येथील अभ्यागत केंद्र पर्यटकांसाठी १६ सप्टेंबरपासून खुले होत आहे. या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. के. चिरंजिवी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील.
First published on: 13-09-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajintha verul visiting centre open for tourist from