नही म्हणता म्हणता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने आमदार निवासातून बाहेर पडून उपमुख्यमंत्र्याचे निवासस्थान असलेल्या देवगिरीमध्ये थाटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आज सकाळपासून परिसरात चहलपहल वाढली आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाचे अधिकारी कामाला लागले असून कुठेही काही कमी पडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.  
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ४८ तासावर आले असताना अजित पवार उपमुख्यमंत्रपदी अरूढ झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आहे. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर अजित पवार यांनी राजीनामा दिल्यावर उपमुख्यमंत्र्याचे निवासस्थान असलेल्या देवगिरीमध्ये कुणाचा मुक्काम राहील, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अजित पवारांची निवास व्यवस्था आमदार निवासमधील इमारत क्रमांक ३ मधील खोली क्रमांक ११ मध्ये करण्यात आली होती. दरम्यान उपमुख्यमंत्रीपद रिक्त असल्याने गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा मुक्काम देवगिरीमध्ये राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
दरम्यान देवगिरीमध्ये कोण राहणार हे निश्चित होत नसल्यामुळे गेल्या काही दिवसात त्या बंगल्यातील काम थांबविण्यात आले होते, मात्र गुरुवारी सायंकाळी अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी आरूढ होणार असल्याचे जाहीर झाल्यावर सार्वजानिक बांधकाम विभागाचे अधिकारी आज सकाळपासून कामाला लागले.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्यासह पक्षाचे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना दुपारी देवगिरीची पाहणी केली. अधिवेशनाच्या काळात दादा समर्थकांची गर्दी वाढणार त्यामुळे परिसरात राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां भेटण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.     
सी.पी. अ‍ॅण्ड बेरार काळात ‘देवगिरी’ हे आंतरराज्य नियंत्रण मंडळाचे कार्यालय होते. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर नागपूरला उपराजधानीचा दर्जा प्राप्त झाला. ठरल्यानुसार नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतले जात असताना त्या काळात उपमुख्यमंत्र्याच्या निवासाची व्यवस्था या कार्यालयात करण्यात येऊ लागली. या निवासस्थानाला देवगिरी असे नाव देण्यात आले. कालांतराने देवगिरीमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्यानंतर आता उपमुख्यमंत्र्याचा शाही बंगला म्हणून याकडे बघितले जाते. देवगिरीच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे.
अजित पवार देवगिरीमध्ये येणार असल्यामुळे बंगला सुसज्ज करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावर्षी काही नवे फर्निचर खरेदी करण्यात आले आहे. एकदंरीत हे निवासस्थान सुसज्ज झाले आहे. मुख्य प्रवेश द्वारातून महत्वाच्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी निवासस्थानाच्या बाजूला मंडप उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
परिसरात असलेल्या लॉनचे सुशोभिकरण करण्यात आले असून विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने निवासस्थानाच्या उत्तरेकडे लोखंडी पत्रे लावण्यात आले आहे. देवगिरीमध्ये तीन मोठे सभागृह असून तीन लहान खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये उपमुख्यमंत्री खास व्यक्तींसोबतच चर्चा करतात.
अन्य मोठय़ा सभागृहात शिष्टमंडळांना भेटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाची आतापासूनच चौकशी केली जात आहे. देवगिरीला लागूनच अन्य मंत्र्यांचे निवासस्थान असल्याने अधिवेशन काळात या परिसरात नागरिकांची, अधिकाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो.
बंगल्यासमोर असलेल्या लॉन शुशोभित करण्यात आले असून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांच्याजवळ प्रवेश पत्र आहे, त्यांनाच देवगिरीमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.