मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्या (मंगळवार) हिंजवडी येथे एका कार्यक्रमासाठी निमंत्रण असून ते एकत्र येण्याच्या शक्यतेने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजितदादांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांशी असलेला संघर्ष, काँग्रेस व राष्ट्रवादीचे ताणलेले संबंध, स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा दोन्ही काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह अशा वातावरणात बाबा-दादा एकत्र येणार का, याविषयी उत्सुकता आहे.
मुळशी तालुक्यातील कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या १५ व्या गळीत हंगामाचा आरंभ मंगळवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे संपर्कमंत्री व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमासाठी अजितदादा प्रमुख पाहुणे आहेत. बँक प्रतिनिधी नात्याने पवार या कारखान्याचे संचालकही आहेत. कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे गळीत हंगामाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहतील, असे सांगण्यात येते. तथापि, सध्याच्या राजकीय वातावरणात मुख्यमंत्र्यांसमवेत ते सध्यातरी हजेरी लावणार नसल्याची खात्री त्यांच्या निकटवर्तीयांकडून दिली जाते. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाविषयी जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव, गजानन बाबर यांच्यासह जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय आमदार तसेच प्रमुख कार्यकर्ते हजेरी लावणार आहेत. मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर या पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्यात कारखान्यात सर्वपक्षीय संचालक मंडळ असून काँग्रेसचे माजी खासदार विदुरा नवले कारखान्याचे अध्यक्ष आहेत.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा