जिल्हा बँक कर्ज प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन विद्यमान आमदारांसह डझनभर नेत्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकेचे मोठे ‘लाभार्थी’ समोर आले. बँकेच्या गरव्यवहाराला खासदार गोपीनाथ मुंडेच जबाबदार असल्याचा सातत्याने जाहीर आरोप करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याच शिलेदारांच्या कर्ज उद्योगामुळे तोंडघशी पडले आहेत.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५ वर्षांंपासून सहकारात पक्षीय राजकारण नको, या गोंडस नावाखाली सर्वपक्षीय नेत्यांची युती होती. या महायुतीचे नेतृत्व खा. मुंडे यांच्याकडे होते. ६० कोटी रुपये ठेवींची बँक अकराशे कोटी रुपये ठेवींवर गेली. मात्र संचालक मंडळात विरोधक नसल्याने सर्वाचीच मनमानी वाढली. परिणामी वर्षभरापूर्वी बँक आíथक अडचणीत सापडल्याने बंद पडली. तत्कालीन अध्यक्ष अमरसिंह पंडितसह राष्ट्रवादीकृत संचालकांनी राजीनामे दिल्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती झाली. महायुतीच्या संचालकांनी मोठय़ा प्रमाणावर अकृषी कर्ज नियमबाहय़ पध्दतीने वाटप केले. सर्वसामान्य माणसांचा पसा मात्र अडकून पडला. जिल्हय़ातील राजकीय चित्र बदलत गेल्याने बँकेच्या माध्यमातून खा.मुंडेंना लक्ष्य करण्याची संधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडली नाही. जिल्हा परिषद, केज विधानसभेची पोटनिवडणूक आणि इतर छोटय़ा-मोठय़ा निवडणुकीपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये, जाहीर सभांमध्ये बँकेच्या दिवाळखोरीचे खापर खा. मुंडेंच्या माथी फोडले गेले. काही दिवसांपूर्वी परळीत आमदार धनंजय मुंडे यांच्या सत्कार सोहळय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकेच्या दिवाळखोरीला खा. मुंडे जबाबदार आहेत, त्यांचा अध्यक्ष जेलमध्ये चक्की पिसत आहे, अशा शब्दात टीकास्त्र सोडले होते. तत्पूर्वीही अनेकदा जाहीर सभांमधून मुंडेंना लक्ष्य केले. प्रशासकाकडून वसुलीची कारवाई सुरु आहे. जवळपास आठशे शेतकऱ्यांवर कारवाई केल्यानंतर मोठय़ांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मागील आठवडय़ात खा. मुंडेंनी प्रशासकाच्या पक्षपाती कारवाईवर कडाडून टीका केली. त्यानंतर दोनच दिवसात प्रशासकांनी काही संस्थांना पुरेसे तारण नसतांना नियमबाहय़ पध्दतीने कर्ज मंजूर केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारीचे दावेदार असलेले आमदार अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश आडसकर, आमदार प्रकाश सोळंके यांचे बंधू धर्यशील सोळंके, माजी आमदार साहेबराव दरेकर, यांच्यासह डझनभर पक्षाचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. तर, जगमित्र सुतगिरणीच्या कर्ज थकीत प्रकरणी संचालक असलेले आणि नव्यानेच राष्ट्रवादीत दाखल झालेले आ. धनंजय मुंडे, त्यांचे वडील पंडितराव मुंडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. तर, काँग्रेसच्या राज्यसभेच्या खा. रजनी पाटील, माजीमंत्री अशोक पाटील यांच्यावरही विखे पाटील कारखान्याच्या थकीत कर्जापोटी गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा बँकेच्या कर्जाचे सर्वात मोठे लाभार्थी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील नेते व कार्यकर्त्यांच्या संस्था असल्याचे पुढे आले. यात राष्ट्रवादीचे आ. अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील जयभवानी सहकारी साखर कारखान्याकडील १७ कोटी १२ लाख, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या संबंधित गजानन साखर कारखान्याकडे ३ कोटी २३ लाख, रमेश आडसकर यांच्या अंबा कारखान्याकडे १२ कोटी ३८ लाख, काँग्रेसचे माजीमंत्री अशोक पाटील यांच्या विखे पाटील कारखान्याकडे २ कोटी ९१ लाख तर माजी अध्यक्ष सुभाष सारडा यांच्या आदित्य एज्युकेशनल संस्थेकडे २ कोटी ७७ लाख बाकी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांच्या कर्ज उद्योगामुळे खा. गोपीनाथ मुंडे यांना बँकेच्या दिवाळखोरीला जाहीरपणे जबाबदार धरत टीका करणारे अजित पवार मात्र तोंडघशी पडले आहेत.  खा. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या संबंधित दंत महाविद्यालयाच्या चालू खात्यावरील कर्जाची तीन कोटी रुपये रक्कम भरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्याकडील संस्थांकडील रक्कम भरावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे बँकेच्या कर्ज प्रकरणावरुन नेते आता परस्परांना राजकीयदृष्टया लक्ष करु लागले आहेत.