टर्मिनसच्या दर्जासह अजनी रेल्वे स्थानक येत्या १ फेब्रुवारीपासून कार्यरत होणार आहे. यानंतर अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस व काझीपेठ पॅसेंजर या दोन गाडय़ा नागपूर स्थानकाऐवजी अजनी टर्मिनसहून सुटणार आहेत. रेल्वे बोर्डाने अजनी स्थानकाच्या टर्मिनस दर्जाला मान्यता दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून होणार असल्याने त्यानंतर अजनी खऱ्या अर्थाने टर्मिनस होईल. यानंतर नागपूर- अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस आणि नागपूर- काझीपेठ पॅसेंजर या दोन गाडय़ा अजनी स्थानकावरून सोडण्यात येतील, तसेच त्यांचा परतीचा प्रवासही येथेच संपेल.
 अमरावती- नागपूर इंटरसिटी एक्सप्रेस आणि काझीपेठ- नागपूर पॅसेंजर यांचा प्रवास १ फेब्रुवारीपासून अजनी स्थानकावर समाप्त
होईल. त्याच दिवसापासून नागपूर- काझीपेठ पॅसेंजरही अजनी स्थानकावरून सोडली जाईल. नागपूर- अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस ३ फेब्रुवारीपासून नागपूरऐवजी अजनी स्थानकावरून सुटेल. अमरावती- नागपूर इंटरसिटी एक्सप्रेस यापुढे बडनेऱ्याला न जाता लूप लाईनवरून थेट नागपूरला येईल.
१२१२० अजनी- अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस सायंकाळी साडेसहा वाजता अजनी स्थानकावरून सुटेल व रात्री ९ वाजून १० मिनिटांनी अमरावती येथे पोहचेल. १२११९ अमरावती- अजनी ही गाडी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुटून सव्वाआठ वाजता अजनी येथे येईल. ५७१३५ अजनी- काझीपेठ पॅसेंजर रात्री ८ वाजून १० मिनिटांनी अजनी स्थानकावरून सुटेल. पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी बल्लारशाह स्थानकावर येऊन १० मिनिटांनी ती पुढे रवाना होईल. ५७१३६ काझीपेठ- अजनी पॅसेंजर पहाटे साडेतीन वाजता बल्लारशाह येथे येऊन ४ वाजता रवाना होईल. सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी ती अजनी स्थानकावर येईल.