दुसऱ्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी लोककलावंत नृत्यसमशेर माया जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या महिला बालविकास आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने तसेच संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र कला अकादमी आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्यावतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन २२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी महिला व बालविकास मंत्री वर्षां गायकवाड उपस्थित राहणार आहे.
केरळचा शिंगारी मेळा, त्रिपुराचे होजागिरी नृत्य, छत्तीगडची पंडवानी, राजस्थानचे कालबेलिया नृत्य अशा भारतातील विविध राज्यांच्या लोककलांचा आस्वाद एकाच व्यासपीठावर रसिकांना घेता येणार आहे.
लोककलेत महिलांचा सहभाग लक्षणीय असतो पण त्याचबरोबर त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्नही असतात. या प्रश्नांचा धांडोळा घेणाऱ्या परिसंवादाचे आयोजनही या संमेलनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर संत कवयित्रींची बंडखोरी आजच्या काळात कुठे आहे?, महिलांचे सामाजिक प्रश्न आणि लोकप्रबोधन, महिला लोककलावंत आणि त्यांचे हक्क, आजची तरुणाई आणि सामाजिक प्रश्न अशा विविध विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात डॉ. सिसिलिया काव्र्हालो, प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, अॅड. वर्षां देशपांडे, प्रतिमा जोशी, नंदिनी आत्मसिद्ध, मुक्ता बर्वे, प्राजक्ता धुळप, नम्रता भिंगार्डे आदी सहभागी होणार आहेत.
हे संमेलन सर्वासाठी खुले आहे. अधिक माहितीसाठी ९८९२४२३५११ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा