महाविद्यालयांचे महोत्सव म्हटले की नाच, गाणी, स्पर्धा, मज्जा, मस्ती. यातही कल्पकता, प्रोत्साहन या गोष्टी असतातच. पण पारंपरिक आणि नियमित महोत्सवांना बगल देत थेट पुराणात घेऊन जाणारा, पुराणांवर चर्चा करणारा महोत्सव तुम्ही कधी पाहिलाही नसेल
किंवा ऐकलाही नसेल. पण असाच अनोखा पुराणशास्त्राला वाहिलेला आशियातील पहिलावहिला ‘आख्यान २०१४’ हा महोत्सव मुंबई विद्यापीठात रंगणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने या अनोख्या महोत्सवाची रचना केली आहे. भारतात जागतिक पुराणकथांवर आधारित एक परिपूर्ण अभ्यासक्रम चालवणारे मुंबई हे एकमेव विद्यापीठ आहे. संस्कृत विभागातर्फे हा अभ्यासक्रम राबविला जातो. पुराणकथांबाबत आज चुकीची किंवा अर्धवट माहिती तसेच एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून माहिती दिली जाते. यामुळे अनेक गरसमजुती तयार होतात. हे टाळण्यासाठी योग्य, नेमकी आणि निष्पक्ष माहिती उपलब्ध करून देण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. हा महोत्सव ५ एप्रिल रोजी विद्यापीठातील संस्कृत भवनात पार पडणार आहे.
या निमित्ताने शिक्षण क्षेत्र, व्यावसायिक आणि सांस्कृतिक क्षेत्र यांचा त्रिवेणी संगम पाहावयास मिळणार आहे. पुराणशास्त्राचा जितका खोलात जाऊन विचार करू, वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विचार करू तितके त्याचे पैलू आपल्यासमोर उलगडत जातात. हे पैलू सर्वासमोर मांडण्याच्या दृष्टीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्कृत विभागप्रमुख डॉ. माधवी नरसाळे यांनी सांगितले.
भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियात सर्वसमावेशक परिपूर्ण आणि नावाजण्याजोगा तौलनिक पुराणकथाशास्त्राचा आणि भारतीय विद्य्ोचा अभ्यासक्रम येथे चालविला जातो. या विभागाचा यंदाचा सुवर्णजयंती महोत्सव आहे. हे निमित्त साधून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचेही डॉ. नरसाळे यांनी सांगितले.
देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्वानांना वर्षांतून एकदा एकत्र आणून कल्पना, विचार, दृष्टिकोन मांडून त्यावर चर्चा घडवून आणण्याचा उद्देश यातून सफल करण्याचा आमचा मानस असल्याचेही त्या म्हणाल्या. अधिक माहिती http://www.facebook.com/aakhyaan यावर मिळू शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा