माझ्यासारख्या साध्या माणसावर अकोले-संगमनेरकरांनी खूप प्रेम केले. त्यामुळेच सलग सात वेळा विधानसभेत जाण्याची संधी आपल्याला मिळाली. आपले नेते शरद पवारांनीही भरभरून दिले. सत्ता असताना मंत्रिपद आणि सत्ता नसताना त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेता केले. या प्रेमातून आपण उतराई होऊ शकणार नसल्याचे भावनात्मक उदगार आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी काढले.
राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर काल पिचड प्रथमच तालुक्यात आले होते. त्यानिमित्त त्यांचा तालुक्याच्या वतीने काल नागरी सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, उपाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, डॉ. राजेंद्र पिपाडा, विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अमोल खताळ, पंचायत समिती सदस्य सरूनाथ उंबरकर, महिला तालुकाध्यक्ष वैशाली राऊत आदी या वेळी उपस्थित होते.
पिचड म्हणाले, जनतेचे प्रेम व नेत्यांच्या विश्वासातून मिळालेली सत्ता आपण पणाला लावून निळवंडे धरण आणि कॅनाॅलची कामे केली. अशीच एकजूट कायम ठेवत भविष्यात काम करण्याची गरज आहे. धर्म आणि भावनेवर राजकारण चालत नाहीतर ते विकासकामावर चालते. आपली लढाई धर्मांध शक्ती आणि जातीयवादी विचाराशी आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी अडविण्याचा कार्यक्रम यापुढे घ्यावा लागणार आहे. आपल्या आमदार निधीतून ७० लाख रुपये तालुक्याच्या पठार भागाच्या विकासासाठी देणार आहे. पिंपळगाव खांड धरणाचे पाणी खाली घारगावपर्यंत आणण्याचे आपले नियोजन आहे. आबासाहेब थोरात म्हणाले, की धरणाचे पाणी मिळवून देण्यात पिचड यांची भूमिका नेहमी महत्त्वाची राहिली आहे. हक्काचे पाणी मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा असल्याने ते आमचे पाणीमंत्री आहेत. नदीपात्रात बंधारे बांधण्याच्या कामाला त्यांनी आता गती द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2013 रोजी प्रकाशित
अकोले-संगमनेरकरांनी भरभरून प्रेम दिले- पिचड
माझ्यासारख्या साध्या माणसावर अकोले-संगमनेरकरांनी खूप प्रेम केले. त्यामुळेच सलग सात वेळा विधानसभेत जाण्याची संधी आपल्याला मिळाली. आपले नेते शरद पवारांनीही भरभरून दिले.

First published on: 18-06-2013 at 01:32 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akole and sangamnerkar gave me lots of love pichad